विजय राऊत, लोकसत्ता
कासा : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह पेट्रोल , डिझेल , सीएनजी गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. ते आता परवडत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून सीमेवरील भागातील वाहनधारकांनी स्वस्त पेट्रोल असलेल्या शेजाराच्या गुजरात राज्यातील सीमेवरील पेट्रोल पंपावर धाव घेण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ११२ रुपये तर डिझेल ९६ रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त दराने आणि सीएनजी गॅस ६३ रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांपेक्षा इंधनावर जास्तीचा मूल्यवर्धित कर आकारला जातो. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर देशात सर्वाधिक आहे. राज्याचा सुमारे १४ टक्के महसूल पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो. महाराष्ट्रात पेट्रोलवर मूल्यवर्धित कर मुंबई-नवी मुंबई-ठाणे परिसरात मूल्याच्या २६ टक्के अधिक १०.१२ रुपये प्रतिलिटर आणि अन्यत्र मूल्याच्या २५ टक्के अधिक १०.१२ प्रति लिटर रुपये. म्हणजे साधारणत: मुंबई वगळता महाराष्ट्रात सध्या तो एकूण २६.३६ प्रति लिटर रुपयांइतका येतो. इतका मोठय़ा प्रमाणात मूल्यवर्धित कर महाराष्ट्रात आकारला जात असल्याने महाराष्ट्रा शेजारील गुजरात , सेलवास या भागात पेट्रोल १० रु. ने तर डिझेल १.५० आणि सीएनजी ७ ते ८ रु किलो ने स्वस्त मिळते. त्यामुळे तलासरी, उधवा, सायवन अशा सीमाभागातील वाहनधारक थोडे स्वस्त इंधन मिळेल म्हणून गुजरात आणि सेलवास भागातील इंधन पंपावर धाव घेतानाचे चित्र आहे. राज्य सरकारने शेजारील राज्याप्रमाणेच मूल्यवर्धित कर घ्यावा व इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला थोडय़ा फार प्रमाणावर दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालक करताना दिसत आहेत.