राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा, वेळेचा अपव्यय
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यावरील वेळ वाचवण्यासाठी ‘फास्ट टॅग’ ही प्रणाली अमलात आणण्यात आली. परंतु त्याचा गोंधळ कायम आहे. वाहनावर बसविलेला फास्ट टॅग स्कॅन न होणे, त्यावरून होणारे वाद परिणामी रोख रक्कम देऊन टोल भरणे वेळेचा अपव्यय आदी समस्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशीही हैराण झाले आहेत. या गोंधळामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर तर ही परिस्थिती सातत्याने येत असते.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोल नाका आहे. येथे सातत्याने वाहनांची ये-जा सुरू असते. चार चाकी वाहनांसह अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. चारोटी टोल नाक्यावरही फास्ट टॅग यंत्रणा लावण्यात आली आहे. येथून येणाऱ्या जाणाऱ्या बहुतेक वाहनांवर फास्ट टॅग बसवलेला असतो. तेथील सेन्सरद्वारे वाहनांवरील टॅग वाचला जाईल आणि चालकाच्या खात्यातून टोलचे पैसे वजा होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, अशी ही यंत्रणा आहे. काही वेळा ही यंत्रणा सुरळीतपणे चालत असते.
परंतु काही वेळाने त्यात बिघाड होतो आणि मग टॅग स्कॅन न होणे, त्यावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी होणारे वाद त्या वादात अडकून पडल्याने वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचे चालक, प्रवासी यांच्या संतापालाही टोल कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. फास्ट टॅग प्रणालीच्या तांत्रिक अडचणींमुळे मात्र वाहनचालकांना अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. काही वाहनचालक वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून वाहने चालवत असल्याचेही या वेळी दिसले. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. तरी याबाबत ‘आयआरबी’ प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सूचनांचे पालन नाही
चारोटी टोलनाक्यावर बुधवारी असाच प्रकार घडला. टॅग स्कॅन होत नसल्यामुळे वाहनांना टोल पार करण्यासाठी येथे अधिकचा वेळ लागला. त्यामुळे वाहनांच्या एक ते दीड किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. वास्तविक टोल नाक्यावर जास्त वेळ लागत असेल तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून टोल न घेता वाहने सोडून वाहतूक कोंडी कमी करावी, अशा सूचना आहेत. असे असतानाही टोल नाक्यावर मात्र या सूचनांचे कधीही पालन केले जात नाही.