रमेश पाटील
वाडा : सेंद्रिय शेतीपासून उत्पादन होणाऱ्या शेतमालाला मोठय़ा प्रमाणावर मागणी येत असल्याने वाडा येथील एका तरुणाने आपल्या गोशाळेत देशी गायींच्या शेणापासून गांडूळ खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारला आहे. गायींच्या शेणापासून गांडूळ खतनिर्मिती करणारा पालघर जिल्ह्यतील हा पहिला प्रकल्प आहे.
वाडा तालुक्यात मौजे धापड येथे श्रीराम दृष्टी गोशाळा असून या गोशाळेचे विश्वस्त किशोर कराळे यांनी या गोशाळेत हा गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. या गोशाळेत १८२ गायी आहेत. या गायींपासून दररोज १२०० ते १३०० किलो शेण उपलब्ध होते. या शेणावर विशिष्ट प्रक्रिया करून दर महिन्याला २५ ते २७ मेट्रिक टन गांडूळ खत तयार होते.
गायींपासून मिळणाऱ्या ओल्या शेणातील उष्णता कमी करण्यासाठी ३० ते ३५ दिवस हे शेण गांडूळ खतासाठी बनविण्यात आलेल्या बेडवर ठेवण्यात येते. या शेणामध्ये सूक्ष्म अन्न जीवाणूंचा पुरवठा केला जातो. ५० ते ५५ दिवसांच्या या प्रक्रियेत उत्तम दर्जाचे गांडूळ खत तयार केले जाते.
वाडा कोलमसाठी अधिक वापर
वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या वाडा कोलमसाठी या खताचा अधिक वापर यापुढे येथील शेतकऱ्यांकडून होणार असल्याने खवय्यांना सेंद्रिय खतापासून तयार होणारा वाडा कोलम उपलब्ध होईल. रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडला जात असून विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या सेंद्रिय खताचा अधिक वापर झाल्यास कीड रोगाला आळा बसेल.
या गांडूळ खताला अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी येत असून लवकरच गायींची संख्या वाढवावी लागेल.
– किशोर कराळे, विश्वस्त, श्रीराम दृष्टी गोशाळा, धापड, ता. वाडा.