पालघर : आगामी मान्सूनच्या दृष्टिने जिल्ह्यातील प्रशासन सज्ज राहावे या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन मान्सून दरम्यान सर्व विभागाने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेक कदम तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी, वनविभाग, महावितरण, महसूल विभाग, कृषी विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तटरक्षक दल, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीच्या आरंभी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तयारी बाबतची माहिती देण्यात येऊन जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने मान्सून तयारीसाठी करावयाच्या कामांची चर्चा करण्यात आली. पूर परिस्थिती उद्भवल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तसेच तात्पुरता निवारा केंद्र, प्रकाश व्यवस्था, शौचालय, पिण्याचे पाणी या बाबींवर सुसज्ज निवारा केंद्रांचे ठिकाण निश्चित करून पूर्वतयारी करण्याचे सूचित करण्यात आले. विविध रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवून घेणे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा भराव टाकला जाणार नाही याची दक्षता घेण्याची देखील संबंधित विभागाला सांगण्यात आले. रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक रस्त्यांवर व नागरी वस्तींमध्ये ठळकपणे लावण्याचे देखील सांगण्यात आले.

पावसाळ्या दरम्यान झाडे उन्मळून पडल्यास, दरड कोसळल्यास वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे तसेच झाडे रस्त्यावर पडल्यास रस्ते मोकळे करण्यासाठी आवश्यक साहित्य व मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. संपर्क तुटणाऱ्या पाड्यांवर जून महिन्यातच पुढील तीन महिन्याची शिधा देण्याची व्यवस्था करण्याचे सुचत करण्यात आले. विविध आरोग्य संस्थांमध्ये औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, वाकलेले विद्युत खांब व लांबलेल्या तारा सरळ करून तारांवर असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून घेण, पर्यटन ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणे व गृहरक्षक दलाची मदत घेणे आदी सूचना देण्यात आल्या. याच बरोबरीने तालुका व विभाग स्थरांवर मान्सून पूर्व तयारी बैठकांचे आयोजन करण्यात यावे व वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच जबाबदारी निश्चित करून घेण्यासाठी कामाची निश्चित विभागणी करण्याचे या बैठकीत सुचित करण्यात आले होते.