टेटावली बचत गटाचा बांबू हस्तकलेतून आर्थिक स्वावलंबनाचा उपक्रम
पालघर : विक्रमगड तालुक्यातील टेटावली भुरकुडपाडा गावातील महिला बचत गटाने बांबू हस्तकलेतून साकारलेले कंदील आता थेट अमेरिकेच्या बाजारांत जाऊन पोहोचले आहेत. बांबूवर प्रक्रिया करून बनवलेल्या या आकर्षक कंदिलांना स्थानिक बाजारातही चांगली मागणी आहे. शेती तसेच कुटुंबातील कामे सांभाळून या गावातील महिला बांबूचे आकाशकंदील तसेच अन्य शोभिवंत वस्तूंच्या निर्मितीतून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग निर्माण करत आहेत.
टेटावली येथील या बचत गटाच्या अनेक महिला दिवसरात्र मेहनत घेऊन बांबूपासून सुबक व रंगीबेरंगी टिकाऊ आकाशकंदील तयार करताना सध्या दिसत आहेत. मागणी असल्यामुळे या महिला आपल्या शेतीची कामे उरकून मिळेल तसा वेळ या कामासाठी देत आहेत व त्या माध्यमातून रोजगाराची साधने उपलब्ध करून घेत आहे. दहा वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील या बचत गटामार्फत सध्या तयार केले जात आहे. या बचत गटाला आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण केशव सृष्टी या संस्थेमार्फत दिले गेले आहेत. २०१९ पासून बांबूंच्या विविध कलाकृती तयार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. मेस बांबू, मानवेर बांबू आणि कासट अशा तीन जातींचा उत्तम बांबू आकाशकंदील व इतर कलाकृती तयार करण्यासाठी प्रक्रिया करून वापरला जात आहे. एका बांबूपासून १५ ते १६ आकाशकंदील तयार होतात. मुंबईपासून ते गुजरातपर्यंतच्या भागांमध्ये ३०० ते ८०० रुपयांना या कंदिलांची विक्री केली जात आहे. एक आकाशकंदील बनवण्यासाठी एका महिलेला एक दिवस लागतो. आतापर्यंत या गटाने ७०० ते ८०० आकाशकंदील विक्री केले आहेत तर २००० आकाशकंदीलची मागणी बचत गटाकडे सध्या आहे. तसेच बांबूपासून बनवलेले आकर्षक टिकाऊ असलेले २०० आकाशकंदील अमेरिका येथे पाठवण्यात आले आहेत, असे टेटावली ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड यांनी सांगितले.
बांबूंची खेळणी, शोभिवंत वस्तू
आधुनिक इलेक्ट्रॉनिक जगात वावरताना मुलांना पारंपरिक खेळाचा व खेळणी यांचा पूर्णपणे विसर पडला आहे. मात्र येथील हस्तकलाकारांनी बांबू पासून विविध लाकडी खेळणी तयार करण्यावर विशेष लक्ष दिले आहे. रेल्वे इंजिन, बदक, गाडी आशा विविध खेळणी तर आकाशकंदील, फुलदाण्या, पाणीबॉटल, चहाकप, मोबाईल स्टॅन्ड, फुलदाणी, बॉल, मोबाईल स्पीकर स्टॅन्ड, फूड स्टॅन्ड, तारपा शोपीस अशा ३५ प्रकारच्या वस्तू येथे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ६० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत विविध वस्तू मिळतात. बांबूचे फर्निचरदेखील येथे तयार करू दिले जात असून वारली चित्रशैली येथील आदिवासी परंपरेची महत्व अधिरेखित करीत आहे.
आम्ही पूर्ण ताकदीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करीत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्यात या कलेने सहकार्य केले आहे. पुढील काळात सुबक व वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवून गरुडझेप घेण्याचा आमचा मानस आहे. – नमिता नामदेव भुरकूड, टेटावली बांबू हस्तकला स्वयंम साहाय्य्यता महिला समूह