पालघर: पालघर-जव्हार-त्रंबकेश्वर-सिन्नर व घोटी या राष्ट्रीय महामार्गातील विक्रमगड शहरातून जाणारा सुमारे १२५ मीटर लांबीचा रस्ता विक्रमगड नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली उखडला असून नागरिकांनी याविषयी आक्षेप नोंदवल्यानंतर काम थांबवण्यात आले. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय तसेच देखभाल दुरुस्तीचे काम अन्य यंत्रणेमार्फत राबविले जात असताना नगरपंचायतीने आरंभलेले काम बेकायदेशीर असल्याचे सांगत उखडलेला रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
पालघर-सिन्नर-घोटी या १६० अ हा राष्ट्रीय महामार्ग विक्रमगड नगरपंचायत हद्दीमधून जात असून नगरपंचायत क्षेत्रातील रस्त्याची मालकी आपली आहे असे गृहीत धरून नगरपंचायतीने आपल्या ठेकेदारामार्फत पाटीलपाडा नाक्यापासून खोदकामाला दोन दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या पूर्ण भागात सुमारे दीड ते दोन मीटर खोदकाम केले जात असल्याने प्रथमतः विक्रमगड वासियांना हे काम राष्ट्रीय महामार्गाचा ठेकेदार करत असल्याची शक्यता वाटली. पहिल्या रात्री काम झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी स्थानिकांनी विचारणा केल्यानंतर ते काम महामार्ग प्राधिकरण करत नसल्याचे स्पष्ट झाले.
काल रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सुरू असलेले काम बंद पाडले. या संदर्भात विक्रमगड नगरपंचायतीने काम सुरू करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा पूर्वसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे घेतली नसल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात विक्रमगड पोलिसांकडे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता विक्रमगड नाक्याजवळ झालेले खोदकाम हे बेकायदेशीर असून नगरपंचायतीने हे काम बंद करून परिस्थिती पूर्ववत करून द्यावी असा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विक्रमगड नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.