तारापूर औद्योगिक वसाहतीमधील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या विराज प्रोफाइल लिमिटेड या कंपनी मध्ये कामगारांमध्ये वाद विकोपाला जाऊन काही कामगारांना तसेच पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
विराज कंपनीत नव्याने स्थापन झालल्या एका कामगार संघटनेने १६ मे पासून संप करून उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली होती. संपाच्या कालावधीत कंत्राटी कामगारांना मार्फत काम सुरु ठेवण्यात येईल अशी शक्यता पाहता कायम कामगारांनी काही दिवस पूर्वीपासूनच प्रत्यक्षात उत्पादन बंद केले होते.
उत्पादन बंद ठेवणाऱ्या कामगारांनी कंपनी आवारा पासून ५० मीटर दूर राहावे असे आदेश औद्योगिक न्यायालय तसेच पालघर प्रथमवर्ग न्यायालयाने दिले होते. याविषयी कामगार उपायुक्त तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊन प्रयत्न सुरू असताना काही कामगारांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचे कामगार प्रतिनिधी कडून आरोप होत आहेत.
या घटनेचे प्रतिसाद उमटून कायम असणाऱ्या १००-१५० कामगारांच्या गटाने विराज कंपनीच्या मध्ये प्रवेश करून कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचे वृत्त आहे. तसेच या वेळी कामगारांनी केलेल्या मारहाणीत काही कामगार, विराज कंपनीचे अधिकारी व पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. आठ- दहा हजार कामगार असणारा या कंपनी समूहात कामगारांमधील वाद विकोपाला गेला असून कंपनी मधील उपकरणांचे व व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या दालनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या कंपनीत पोलिसांचा मोठा फौज फाटा पोहोचल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत किमान आठ ते दहा कामगार व तितक्याच संख्येने पोलीस जखमी झाले असून किमान पंचवीस वाहनांची नासधूस झाल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात पालघर पोलिसांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.