रूळ ओलांडणाऱ्यांवर निर्बंध; मुंबई-दिल्ली अंतर चार तासांनी कमी होणार

निखिल मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : विरार ते सुरत या १६० किलोमीटर रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुतर्फा संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने आराखडा तयार केला आहे. या संरक्षक भिंतीमुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर निर्बंध येणार असून परिणामी रेल्वेचा वेग वाढून मुंबई ते दिल्ली हे अंतर चार तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे.

दिल्ली ते मुंबईदरम्यान रेल्वे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रेल्वे लवकरच विरार ते सुरतदरम्यान १६० किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरील रुळांलगत संरक्षक भिंत तयार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गावर  संरक्षक भिंत बांधण्यासाठी अंदाजित १२०.१६  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पावसाळा संपल्यानंतर त्याचे काम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी मार्च २०२४ ची अंतिम मुदत निश्चित केली गेली आहे.

रेल्वे मार्गाच्या दुतर्फा परिसरात ठिकठिकाणी गावे वसली आहेत. अलीकडून पलीकडील गावात, शहरात जाण्यासाठी पादचारी पूल नसल्यामुळे येथील नागरिक हे रेल्वे रूळ ओलांडत असतात. तर जनावरांचाही वावर असतो.  त्यामुळे या मार्गावर रेल्वेचा वेग नियंत्रित करावा लागतो. रेल्वे रुळालगत संरक्षक भिंत उभारल्यामुळे हे अडथळे दूर होऊन रेल्वेचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे, असे  रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. मार्गावर पादचारी पूलही बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे त्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.  या प्रकल्पासाठी निविदा १३ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

रेल्वेचा वेग वाढणार

मुंबई-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा सध्याचा वेग ताशी १३० किमी इतका आहे. या वेगाने दिल्ली ते मुंबईदरम्यान जाण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. विरार ते सुरतदरम्यानच्या रेल्वे मार्गावरील रुळालगत संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे हा वेग १६० किमी ताशी होईल, असा रेल्वेचा विश्वास आहे. यामुळे ही वेळ केवळ १२ तासांपर्यंत कमी केली जाईल.

रेल्वेची गती वाढणार

मुंबई-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा सध्याची गती ताशी १३० किमी इतका आहे. या गतीने दिल्ली ते मुंबईदरम्यान जाण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. विरार ते सुरतदरम्यानच्या रेल्वे मार्गावरील रुळालगत संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे ही गती१६० किमी ताशी होईल, असा रेल्वेला विश्वास आहे. त्यामुळे अंतर चार तासांनी कमी होऊन ते १२ तासांपर्यंत येईल.