डहाणू : डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) येथील जत्रा सुरू असतानाच येथील ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच नितेश भोईर यांचा भीषण अपघात झाला असून हा अपघात घडवून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बुधवार २३ एप्रिल रोजी पहाटे ४.१५ ते ४.३० वाजताच्या सुमारास सरपंच जत्रेतुन घरी जात असताना रस्त्यात निर्मनुष्य ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सरपंच नितेश भोईर हे बुधवारी जत्रेमध्ये आपले काम आटोपून पहाटेच्या सुमारास घराकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. निर्मनुष्य ठिकाण असल्यामुळे अपघातानंतर त्यांना तत्काळ मदत मिळण्यास उशीर झाला असून स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सध्या ते बेशुद्ध अवस्थेत गुजरात मधील वापी येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सध्या विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू आहे. जत्रेमध्ये लाखोंची गर्दी उसळत असून याचा फायदा घेत सरपंच यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलिसांनी तपासातून घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती दिली.