पालघर : स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.