पालघर : पालघर जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीनअंतर्गत आठ तालुक्यांतील १३८ किलोमीटर लांबीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग उन्नवत (दर्जा सुधार) करण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेले आहेत. केंद्र शासनाकडे हे प्रस्ताव अजूनही मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे या दर्जेदार रस्त्यांसाठी जिल्ह्याला अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत रस्त्याचा दर्जा सुधारित करणे या नावाने राज्यात सुमारे ६५५० किमीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील १३८ किमीचे विविध रस्ते मंजूर होऊन ते प्रस्ताव राज्यमार्फत केंद्राकडे गेले आहेत. जिल्ह्यात सुमारे १९ रस्त्यांचे १२५ कोटींचे प्रस्ताव केंद्राच्या ग्रामविकास मंत्रालयात आहेत. पालघर जिल्ह्यात योजनेंतर्गत दोन टप्पे मंजूर होऊन कामेही पूर्ण झालेली आहेत. तिसऱ्या टप्प्यात रस्त्याचे दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे प्रस्ताव तयार केले होते. केंद्राने नेमलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात हे प्रस्ताव तांत्रिक तपासणी होऊन ते परिपूर्ण केले गेले. पुढे राज्य शासनाने या सर्वाना मंजुरी देऊन ते केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले. मात्र केंद्राकडे हे प्रस्ताव पजून आहेत. या कामांमध्ये केंद्राचा ६० टक्के व राज्याच्या ४० टक्के हिस्सा आहे. केंद्राने हे रस्ते प्रस्ताव अजूनही मंजूर का केलेले नाहीत याचे उत्तर नाही. काहींच्या मते सरकार प्रस्तावांची तांत्रिक छाननी करत असल्याचे सांगितले गेले असले तरी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून त्याची तांत्रिक छाननी केली आहे. त्यामुळे पुन्हा छाननीचा तगादा का, असा सवाल उपस्थित होत आहे.
केंद्राकडे मंजुरीसाठी प्रस्तावित रस्ते
डहाणू
- राज्य महामार्ग ७३ बांधघर निंबापुर बोहेपाडा ६.९०० किमी.
- राज्य महामार्ग ३० ते सारणी आंबेवाडी-उर्से- साये ते मार्ग १४ -१५.१०० किमी.
- राज्य महामार्ग ३० ते गंजाड-औंढाणि-धानोरी-ओसर्विरा-कांदरवाडी-दहीयाळे-पावन ते राष्ट्रीय महामार्ग ७३ असा ८.२७० किमी.
जव्हार - राज्य महामार्ग ७२ ते केळीचा पाडा सांबर पाडा दाभोसा रस्ता असा तीन पॉईंट ८६५ किमी.
- इतर जिल्हा मार्ग ३९ ते कुतुर विहीर ते इतर जिल्हा मार्ग ४२ असा २.८०० किमी चा रस्ता
- चांभारशेत-भुसारा पाडा-तिलोनदा रस्ता असा ७.३०० किमी .
मोखाडा - राज्य मार्ग ३० ते तूळय़ाचा पाडा- हिरवे असा ४.३४० किमी
- प्रमुख जिल्हा मार्ग २० ते मोरांडा-गोंदे बुद्रुक ते गायमुख – सहा किमी.
पालघर - राज्य मार्ग ७५ परनाळी ते बोईसर -९.३९ किमी
- राज्य मार्ग ७४ वेळगाव-कोंढाण ते मनोर – ७.६५० किमी
- प्रमुख जिल्हा मार्ग ३० ते बोरशेती असा ४.८८० किमी.
तलासरी - राज्य मार्ग ७३ ते झरी-वळणी पाडा- सावने आश्रम शाळा- पाटील पाडा ते इतर जिल्हा मार्ग १९१ – ५.०५० किमी
- प्रमुख जिल्हा मार्ग ते सुंभा, अच्छाड, काजळी, उपलाट आश्रम शाळा, कोचाई, सावरोली, वरवाडा, शनिवार वाडा, शिपाई पाडा, बोबापाडा, वनग पाडा, कवाडा, सावने, वडवली ते राष्ट्रीय महामार्ग ८ – ८.९५० किमी.
वसई - कर्नर कोशिंबे ते खर्डी, डोलीव, वैतरणा, दहिसर, कन्हेर – ७.३ किमी.
विक्रमगड - इतर जिल्हा मार्ग ९६ ते कुर्झे,पाटील पाडा, हाताने, देहर्जे ते इतर जिल्हा मार्ग ७८ – ७. ४७ किमी
- इतर जिल्हा मार्ग ९६ ते चाबके तलावली, घाणेघर, केव, म्हसरोली, कुरुंझे – ७.१६ किमी.
वाडा - दहे पिक – ५. ६४ किमी
- खुपरी, देवगाव, तीळगाव ते अबिटघर असा ८.७९ किमीचा रस्ता.
-पोशेरी, पिंपळास, खरीवली – ४.३२ किमी.
-गारगाव, मांगुळ ते राज्य मार्ग ७७ -७.२ किमी.