आरोग्य सुविधा नसल्याने करोनाबाधित बाळाच्या उपचारासाठी वणवण

पालघर : राज्य शासनाने तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा अशी सूचना दिली आहे. यामध्ये बालकांच्या आरोग्य सुविधांबाबत उपाययोजना करण्याचे सुचविलेले असतानाही पालघर जिल्हा व आरोग्य प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका सोमवारी करोनाची लागण झालेल्या नवजात बाळाला बसला. या बाळावर उपचारासाठी वणवण करण्याची वेळ  तिच्या पालकांवर आल्यामुळे या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर तालुक्यातील सफाळे दारशेत येथे राहणाऱ्या अश्विनी काटेला या गरोदर महिलेची पालघरमधील एका खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे प्रसूती झाली. मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे जन्माला आलेले बाळ हे वजनाने कमी होती. त्यामुळे त्याला पालघरमधील एका दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. रुग्णालयात  उपचारासाठी आणल्यानंतर तेथे तिची प्रतिजन चाचणी करण्यात आली. या प्रतिजन चाचणीमध्ये बाळाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुलीवर तेथे उपचार देणे शक्य नसल्याचे सांगत या खासगी रुग्णालयाने मुलीच्या वडिलांना डहाणू ग्रामीण रुग्णालयाची चिठ्ठी दिली.

मात्र ग्रामीण रुग्णालयातही मुलीच्या उपचाराची सुविधा नव्हती. त्यानंतर तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. येथे  डॉक्टरांनी तिला तपासून व प्राथमिक उपचार करून जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या बाळाला रुग्णवाहिकेतून तिचे वडील अशोक यांनी जव्हार गाठले.

जव्हार येथे गेल्यानंतर बाळाला करोनाची लागण असल्यामुळे उपचार देणे शक्य होणार नाही, तसेच जव्हार रुग्णालयात इतर बालके दाखल असल्याने त्यांना ही लागण होण्याची शक्यता आहे, असे सांगत येथे  उपचारास नकार दिला.

या नवजात बाळाच्या कुटुंबाची घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने तिला इतर ठिकाणी उपचारासाठी नेणे शक्य नव्हते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी जव्हार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून मुलीवर तात्काळ उपचार सुरू करा, अशा सूचना दिल्या. त्यावेळी नवजात बाळाला रुग्णालयात दाखल केले गेले व तिथे तिचा उपचार सुरू केला गेला. सद्यस्थितीत या बाळाला स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरू असले तरी बाळाची प्रकृती अजूनही स्थिर नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सूचनेचे गांभीर्य नाही

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे व जिल्ह्यत उपाययोजना आखाव्यात अशा सूचना राज्य शासनासह पालकमंत्री दादा भुसे व अलीकडेच पालघर जिल्हा दौरा केलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. असे असले तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कोणतीच तयारी न केल्यामुळे या नवजात बाळाच्या उपचारासाठी फरफट करावी लागली. तब्बल सहा ते आठ तास रुग्णवाहिकेतच या नवजात बाळाच्या उपचारासाठी तीन रुग्णालय पालथी घातली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी करून ठेवली असती किंवा आरोग्य सुविधा उभारल्या असत्या तर या नवजात बाळाच्या उपचारासाठी पालकांची फरफट थांबली असती, अशी प्रतिक्रिया या प्रकाराबाबत व्यक्त होत आहे.

‘गंभीर बाब’

तिसऱ्या लाटेनुसार सज्ज राहण्याच्या राज्य सरकारने नुसती घोषणाबाजी केली असली तरी प्रत्यक्षात कृती काहीच नाही.  नवजात मुलीच्या उपचारासाठी फरफट होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत सरकारशी चर्चा करून  जिल्ह्यत यंत्रणा उभी करावी असा तगादा लावणार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी  जिल्हा दौऱ्यादरम्यान सांगितले.