कासा : पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जिल्ह्यातील जलाशयातील पाण्यामधून मुंबई, वसई, मिरा भाईंदर अशा शहरी भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवली जाते. असे असताना पाणी वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने तसेच जलजीवन मिशनचे काम अतिशय मंदगतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा तालुक्यातील सहा गावे आणि ५५ पाड्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. धामणी, वैतरणा, अप्पर वैतरणा अशी शहरी भागाला पाणी पुरवठा करणारे जलाशय सुद्धा याच भागात आहेत. तरी सुद्धा जानेवारी महिना सुरू होताच या भागात पाणीटंचाई ला सुरवात होते. मोखाडा जव्हार भागात जानेवारी महिन्यातच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले होते.

वाढती उन्हाची काहिली आणि भूगर्भातील पाणी कमी होत असल्याने एप्रिल महिना सुरू होइपर्यंत पूर्व भागातील चार तालुक्यातील सहा गाव आणि ५५ पाड्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली आहे. या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. १९ टँकर च्या माध्यमातून दररोज ५० पेक्षा अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.

२०१९ मध्ये केंद्र सरकारने जलजीवन मिशन कार्यक्रम सुरू केला होता. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या डोक्यावरील हंडा उतरवणे व प्रत्येक घरात नळाने पाणी पोहचवले जाणार होते. जिल्ह्यात सर्वत्र या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च होत असले तरीही योग्य नियोजन, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे अजूनही पाणीटंचाई ची समस्या सोडवण्यात अपयश आले आहे.

एकीकडे जलजीवन मिशन वर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे टँकर वरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. टँकर द्वारे नागरिकांना काही प्रमाणात पाणी मिळत असले तरी पाळीव प्राणी, जंगलातील प्राणी यांना पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायम आहे.

जलजीवन मिशन ची सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा या कामात लक्ष घालून ही कामे वेगाने पूर्ण करू घ्यावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. जलजीवन अंतर्गत कामांचा आढावा संबंधित गटविकास अधिकारी यांनी घ्यावा व झालेल्या कामाचा दर्जा तपासावा असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुचित केले आहे.

यासंदर्भात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी टँकरची संख्याही कमी झाली असल्याची दिसून आले आहे. पुढच्या वर्षी टँकर मुक्त हे चार तालुके केले जातील असे नियोजन सध्या सुरू असल्याची माहिती दिली.

मोखाडा

गावे दोन पाडे २६
टँकर नऊ
प्रती दिवस फेऱ्या २८

वाडा

पाडे १७
टँकर चार
प्रती दिवस फेऱ्या ११

जव्हार

गावे चार
पाडे आठ
टँकर पाच
प्रती दिवस फेऱ्या १५

विक्रमगड

पाडे चार
टँकर एक
प्रती दिवस फेऱ्या तीन

एकूण तालुके – विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा

एकूण गावे सहा
एकूण पाडे ५५
टँकर संख्या १९