कामांचा जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आढावा
नितीन बोंबाडे
डहाणू : सन २०१५ मध्ये पालघर आणि डहाणू तालुक्यांतील २९ गावांच्या पाण्यासाठी सुरू केलेली बाडा पोखरण नळपाणी योजना सहा वेळा मुदतवाढ घेऊन आजपर्यंत पूर्णत्वास आलेली नसल्याने रखडलेली योजना पूर्णत्वास नेण्याचे व तक्रारीवरून पाहणी करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत दिले. संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या तक्रारी समजून घेत पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालघर आणि डहाणू तालुक्यातील २९ गावांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील अनेक कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण ठेवली आहेत, तर अनेक गावांमध्ये अंतर्गत वितरण वाहिनी टाकलेली नाही. टाक्यांची अंतर्गत जोडणीची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे डहाणू तालुक्यातील अनेक गावांची योजनेच्या कामाबद्दल तक्रार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याच्या प्रयत्नात असल्याने नागरिकांचा रोष पत्करावा लागला आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींचा विरोध आहे. परिणामी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जल व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी योजनेतील अपूर्ण कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. दौऱ्यादरम्यान स्थानिक सरपंच, ग्रामस्थ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार असून काम सदोष आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
डहाणू व पालघर तालुक्यातील २९ गावांना व ४ पाडय़ांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे या हेतूने राबवलेली बाडा पोखरण नळपाणी योजना कालबाह्य झाली आहे. या योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु सन २००६ बाडा पोखरण योजनेतील जलवाहिन्या व जलकुंभ जीर्ण झाल्याने आ. आनंद ठाकूर तसेच माजी आ. राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने योजनेचे नूतनीकरण करण्यात आले. जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य घेऊन ४९ कोटींची योजना ६२ कोटींपर्यंत वाढवण्यात आली. सहा वेळा मुदतवाढ घेऊनसुद्धा आर. ए. घुले या ठेकेदारांनी बाडा पोखरण नळपाणी योजना सदोष ठेवल्याने किनारपट्टीच्या गावांतील लोकांचे हाल सुरू आहेत. बाडा पोखरण नळपाणी योजनेत डहाणू तालुक्यातील २६ गावे आणि पालघर तालुक्यातील ३ गावे व ४ पाडय़ांचा समावेश आहे. डहाणूतील गोवणे, वाणगाव, साखरे, दाभले, वणई, पळे, डेहणे, कापशी, ओसर, तणाशी, आसनगाव, माटगाव, चंडिगाव, वासगाव, धुमकेत, बाडापोखरण, गुंगवाडा, पोखरण, तडीयाळे, धाकटी-डहाणू, बावडे, देदाळे, कोलवली, चिंचणी, वरोर, वाढवण, आंबीस्तेपाडा ही २६ गावे, तर पालघर तालुक्यातील तारापूर, कांबोडे, सावराई इत्यादी गावांचा समावेश आहे. या गावांना पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे.
बाडा पोखरण नळपाणी योजनेची कामे पूर्ण झाल्याशिवाय अपूर्ण योजना आम्ही हस्तांतरण करू देणार नाहीत. याबाबत मीटिंगमध्ये निर्णय झाला आहे.
– वशिदास अंभिरे, मच्छीमार नेते
बाडा पोखरण नळपाणी योजनेसंदर्भात अद्याप कामे अपूर्ण असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या तक्रारी समजून घेत योजनेचा पाहणी दौरा ठरवला आहे. या वेळी ही योजना पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. कामे सदोष आढळल्यास कारवाई करू.
– वैदेही वाढाण, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष