|| प्रसेनजीत इंगळे
विरार : करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यावर शहरातील हॉटेल सुरू झाले आहेत, पण वाढत्या तेलाच्या किमतीमुळे या हॉटेलधारकांनी तेलाचा मर्यादेपेक्षा अधिक वापर चालवल्याने तसेच ते वापरून काळ्या पडलेल्या या तेलाचे संकलन घटले आहे. या काळ्या तेलाच्या पुनर्वापराने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई-विरारमध्ये खुलेआम सातत्याने पुनर्वापर केलेल्या तेलाचा काळाबाजार सुरू आहे. त्यात तेलाच्या किमती वाढल्याने उपाहारगृहामध्ये सर्रास तेलाचा अनेक वेळा पुनर्वापर केला जात आहे.
वसई-विरारमध्ये चार हजारांहून अधिक उपाहारगृहे आहेत. त्यातील केवळ ६०० उपाहारगृहांची नोंदणी आहे. या उपाहारगृहांतून दररोज हजारो लिटर पुनर्वापित तेल निघते. हे तेल साखळी पद्धतीने सर्रास विकले जाते. रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणारे आणि फरसाण विक्रेते या तेलाचा वापर करतात. नालासोपारा धानीव, पेल्हार, हनुमान नगर, टाकीचा पाडा, शर्मा कंपाऊंड, संतोष भुवन, वसई महामार्गाजवळील अनेक वस्त्यांत असे कारखाने उभे आहेत. तिथे हे तेल खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाते.
या संदर्भात माहिती देताना आरिस बायो एनर्जी या शासनमान्य कंपनीचे पदाधिकारी यांनी माहिती दिली की, उपाहारगृहामधील हे तेल बायोडिझेल बनविण्यासाठी वापरले जाते. शासनाकडून दर कमी असल्याने अनेक व्यावसायिक आम्हाला तेल न विकता खासगी व्यापाऱ्याला विकतात त्याचा वापर खुल्या बाजारात केला जातो. भंगार विक्रेतेसुद्धा आता हे तेल खरेदी करू लागले आहेत. काही जण साबण बनविण्याच्या नावाखाली या तेलाची खरेदी करतात. मुळात त्यात सल्फाइड मिसळल्याने यातील घाण खाली बसते आणि तेल वरती राहते. हेच तेल पुन्हा बाजारात आणले जाते. हे तेल नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे, असे त्यांनी सांगितले. टिपरे हेल्थकेअरचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टिपरे यांनी माहिती दिली की, या तेलामुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. कॅन्सर, हृदयविकार आणि पचनाचे अनेक विकार जडले जातात, अशी भीती व्यक्त केली आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी घालून दिलेल्या नियमानुसार तेल तीन वेळा वापरता येते; पण उपाहारगृहाचे मालक हे तेल सात ते आठ वेळा वापरतात. तसेच हे वापरलेले तेल शासनमान्य वितरकाला विकत देणे बंधनकारक आहे, कारण नंतर यावर प्रक्रिया करून बायोडिझेल बनविण्यात येते. या तेलाचा दर २० ते २५ रुपये किलोप्रमाणे ठरवून दिला आहे; पण हॉटेलमालक अधिक आर्थिक नफा मिळवण्यासाठी हे तेल ५० ते ७० रुपये दराने खासगी विक्रेत्यांना देतात. हे खासगी वितरक या तेलावर रासायनिक प्रक्रिया करून हेच तेल ९० ते १०० रुपये दराने हातगाडी, चायनीजच्या गाड्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते, छोटे उपाहारगृहे तसेच फरसाण आणि तळलेले खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना विकतात.
वसईत ६०० केवळ हॉटेल नोंदणीकृत आहेत. त्यात करोनामुळे अनेकांचा धंदा कमी झाला आहे.
यासंदर्भात ज्या हॉटेलमध्ये दिवसाला ५० लिटर तेल वापरले जाते असेच हॉटेल यात सामील आहेत. अशा हॉटेलवर पाहणी करण्याचे काम आमचे सुरू आहे. लवकरच या संदर्भात विशेष मोहीम राबवली जाणार आहे, असे अन्न व औषध प्रशासन, ठाणेचे सहआयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी सांगितले.