लोकसत्ता वार्ताहर
पालघर : पालघर शहरातील अनेक विद्युत खांबांना व विद्युत रोहित्राना वेलींनी विळखा घातल्याने त्या दूर करण्याच्या कामी महावितरणचे कर्मचारी गुंतले आहेत. शुक्रवारी व इतर वेळी वीज पुरवठा खंडित करून विद्युत खांबावरील वेली हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. यासह मे व जून महिन्यात पडणाऱ्या अवकाळी व पूर्वमान्सून पावसाअगोदर विद्युत खांब व रोहित्राची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.
शहरात विद्युत रोहित्र व खांब असलेल्या भागात झाड व वेली मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक वेली या खांबाचा आधार घेत वर चढत जाऊन खांबांना विळखा घालतात. त्यामुळे तारांचे एकमेकांना घर्षण होऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. उन्हाचा तडाखा वाढला असून विजेचा वापर देखील वाढला आहे. अनेक वेळा वीज काही काळ खंडित झाल्यास नागरिकांची चिडचिड होते. त्या दृष्टीने महावितरण विभागाकडून शुक्रवारी एक पूर्ण दिवस भारनियमन करून खांबांवरून वेली दूर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
अनेक खांबावरील वेली सुकलेल्या असल्याने तारांचे घर्षण होऊन एखादी ठिणगी उडाल्यास लगेच त्याठिकाणी पेट घेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सोयीने शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पालघर पूर्वेकडील गांधीनगर, आंबेडकर नगर, घोलवीर व वेवुर या परिसरातील विद्युत खांब वेलीमुक्त करण्यात आले. वेली हटवितांना काही ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो, याकामामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा थोडा वेळ थांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे अशी मागणी महावितरण कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
भारनियमन करून खांब वेलीमुक्त करण्याचे काम सुरू असून ज्या खांबांवरील वेळी हटविल्या नाही ते देखील लवकरच स्वच्छ करण्यात येतील. -सुनील भारंबे, महावितरण कार्यकारी अभियंता, पालघर
अवकाळी अगोदर विद्युत खांबांची पाहणी होणे आवश्यक
पालघर शहरात अनेक विद्युत खांब जीर्ण झाले असून काही खांब तिरके देखील आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मोखाडा, वाडा, जव्हार या भागात अवकाळी पाऊस व सुसाट्याचा वारा सुटला होता. अशीच परिस्थिती अनेकदा मे व जून महिन्यात उद्भवत असल्याने या वादळी वाऱ्यात अनेक विद्युत खांब पडण्याच्या घटना घडत असतात. तर काही वेळा विद्युत तारा पडून नागरिक व जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. यादृष्टीने मे महिन्या अगोदर महावितरण विभागाने जीर्ण झालेले खांब बदलणे, विद्युत रोहित्र परिसराची स्वच्छता करणे, खांबांवरील तारा तपासून घेणे आवश्यक झाले आहे.
उघड्या पेट्यांचा धोका कायम
शहरातील रस्त्यालगत असलेले अनेक विद्युत रोहित्र पेट्या या उघड्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जनावरे, लहान मुलांचा त्या भागाला स्पर्श झाल्यास धोका उद्भवण्याची शक्यता त्यामुळे विद्युत रोहित्रचे योग्य नियोजन करणे, पेटीला कुलूप लावणे, पेटीची उंची वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजूला जाळी बसवून खाली काँक्रीटीकरण करणे, विद्युत रोहित्रांची जागा बदलून उंच जागी बसवण्यात यावे, लोंबकळत पडलेल्या केबलचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.