बोईसर : इमारतीची रंगरंगोटी करताना वीजेच्या तारेच्या संपर्कात येऊन एका कामगाराचा मृत्यू तर दूसरा कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना बोईसरमध्ये घडली आहे. जखमी कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोईसरच्या सरावली परीसरातील ओसवाल एम्पायर या गृहसंकुलातील सत्यम या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळी रंगरंगोटी करण्यासाठी लावण्यात आलेल्या उंच शिडीवर चढले असताना या शिडीच्या वर असलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन शिडीवरील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. दोन्ही कामगारांना उपचारासाठी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये संदेश गोवारी (३५) या कामगारचा मृत्यू झाला असून उत्तम सातवी (३०) या जखमी कामगारावर उपचार सुरू आहेत.
दोन्ही कामगार पालघर तालुक्यातील निहे गावचे रहिवाशी असून एका कंत्राटदाराकडे रोजंदारीवर काम करीत होते. अपघातानंतर घटनास्थळी बोईसर पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी व विद्युत निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. या प्रकरणी बोईसर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
हेही वाचा – पुणे : बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून
बोईसर व तारापूर परीसरात इमारतींचे बांधकाम व कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंत्राटदारांकडून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी आणि उपकरणे न वापरल्याने अशा दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून संबंधित विभाग मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.