|| विजय राऊत
चुकीच्या पद्धतीने जेट्टीचे बांधकाम, मच्छीमारांना फटका
कासा: तलासरी तालुक्यातील झाईतील जेट्टी चुकीच्या पद्धतीने बांधली गेल्यामुळे तिच्या फटका मच्छीमारांना बसत आहे. समुद्राला भरती आल्याशिवाय जेट्टीजवळील बोटी समुद्रात जाऊ शकत नाही किंवा ती परत आणू शकत नाही, अशी येथे परिस्थिती निर्माण झाली आहे.
तलासरी तालुक्यातील झाई हे गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. प्रामुख्याने या परिसरातील मच्छीमार हे मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. २०१६ साली मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी नाबार्डच्या आर्थिक साहाय्यातून १० कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी जेट्टी बांधण्यात आली. परंतु या जेट्टीचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. समुद्राला भरती येत नाही, तोपर्यंत जेट्टीजवळील बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ शकत नाही. तसेच समुद्रातून मासेमारी करून आलेल्या बोटी जेट्टीपर्यंत पोहचू शकत नाही. बोटी समुद्रातच अडकून पडतात. त्यामुळे मासे वेळेत विक्रीसाठी आणता येत नाहीत. परिणामी मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड बसतो.
झाई येथील जेट्टीवर साधारणपणे ३०० ते ३५० बोटी मासेमारी करण्यासाठी जातात, त्याद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न १५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. जेट्टीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सर्व मच्छीमारांना मिळून वार्षिक पाच ते सहा कोटीचे नुकसान होते. तरी मच्छीमारांच्या सोयीसाठी या जेट्टीचे बांधकाम योग्य पद्धतीने करावे, जेणेकरून मच्छीमारांना जेट्टीचा उपयोग होईल.
-विनू माच्छी, माजी अध्यक्ष, मच्छीमार संघटना