-
राज ठाकरेंच्या मनसे पक्ष आणि भाजपाच्या युतीचा विषय मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. राज ठाकरे यांनी अमित शाह यांची दिल्लीमध्ये जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर भाजपा-मनसे युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.
-
काय चाललयं, काय घडतयं या सगळ्यावर राज ठाकरे पाडवा मेळाव्यातून भूमिका स्पष्ट करतील, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी देत होते.
-
अखेर राज ठाकरेंनी त्यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुडीपाडवा सभेतून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
-
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर, आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे.” (Photo Source: Devendra Fadanvis/Facebook Page)
-
“मोदींना ‘राज’मान्यता पण, ‘व्याभिचाराला’ नाही, राज ठाकरे यांच्या या वाक्याचा अर्थबोध झाला नाही; कार्यकर्त्यांनाही हे समजलेले नाही. मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही, असे म्हणणे म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही, असा तर अर्थ नाही ना?” असा प्रश्न राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. (Photo Source: Jitendra Awhad/Facebook Page)
-
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुमिकेला धरुन राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे” अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी दिली आहे. (Photo Source: Vinod Tawde/Facebook Page)
-
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले “दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजपा बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपाच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? कदाचित एखादी नस दाबली असेल. आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही.” (Photo Source: Vijay Wadettiwar/Facebook Page)
-
“विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत.” अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. (Photo Source: Chandrashekhar bawankule/Facebook Page)
-
राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील.” (Photo Source: Rohit Rajendra Pawar/Facebook Page)
-
तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणाले “राज ठाकरेंच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद महाराष्ट्रात आणखी वाढेल, आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील.” (Photo Source: Dr Shrikant Shinde/Facebook Page)
-
शिवसेना उपनेत्या (उबाठा) सुषमा अंधारे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्या म्हणाल्या, “राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही, असे म्हणत व्याभिचाऱ्यांच्याच पंगतीला जाऊन बसायचे याचा अर्थ काय? काय व्याभिचाराचे स्टँडर्ड बदलले आहे का? एकट्या उद्धव साहेब यांना हरवण्यासाठी भाजपाला किती कसरती कराव्या लागत आहेत.” (Photo Source: Sushma Andhare/Facebook Page)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”