-
नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघातील नरसी येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. (सर्व फोटो सौजन्य- Amit Shah/Facebook Page)
-
या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे संघटनमंत्री संजय कौडगे, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
-
या सभेत अमित शाह यांनी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली.
-
डॉ. मनमोहनसिंग,सोनिया गांधी यांच्या यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्राला काय दिले? याचा हिशेब शरद पवार यांना द्यावाच लागेल, असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला.
-
“पवार केंद्रात मंत्री असताना दहा वर्षांत महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी रुपये मिळाले होते, तर मोदींच्या १० वर्षांत केंद्राकडून महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे, शरद पवार यांच्यावर टीका करताना अमित शाह यांनी सांगितले.
-
“महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. गुजरातमध्ये म्हण आहे तीन तिघाडा काम बिघाडा. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकलं. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकतात? शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत,” अशी टीका त्यांनी नांदेडच्या सभेत केली आहे.
-
काॅग्रेसला लक्ष्य करताना ते म्हणाले, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात काश्मीर प्रश्नाचा आणि महाराष्ट्र, राजस्थानचा काही संबंध नाही. तुम्हीच सांगा कलम ३७० हटायला हवं होतं की नाही? यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर अमित शाह म्हणाले एखाद्या अनौरस बाळासारखं काँग्रेसने कलम ३७० सांभाळलं. मोदींनी कलम ३७० रद्द केलं आणि काश्मीर भारताशी जोडण्याचं काम केलं. सोनिया-मनमोहन यांच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले होत होते.”
-
पुढे ते म्हणाले “मोदी पंतप्रधान झाले आणि आज पाकिस्तानची देशाकडे डोळे वर करुन पाहण्याची टाप नाही. पाकिस्तानच्या घरात घुसून मोदींनी पाकिस्तानला उत्तर दिलं. संपूर्ण जगात मोदींनी संदेश पाठवला की आमच्या देशाकडे आणि आमच्या सीमांकडे नजर उचलून पाहाल तर तसं उत्तर मिळेल.”
-
“नरेंद्र मोदींनी गरिबांच्या कल्याणासाठी काम केले. महाराष्ट्रासह देशामध्ये वेगवेगळय़ा योजनांच्या माध्यमातून लोकांना मूलभूत सोयीसुविधा दिल्या. देशाचा सर्वागीण विकास मोदीच करू शकतात, ही निवडणूक मजबूत भारताचा पाया घालणारी आहे. २०४७ पर्यंत देशाला पूर्ण विकसित करायचे आहे,” असेही ते म्हणाले.

IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO