-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही प्रचाराचा धडाका उडाला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांनाही मुलाखती देत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काय बोलले आहेत? हे जाणून घ्या
-
पुढील २५ वर्षांचं नियोजन स्पष्ट केलं.
पुढील २५ वर्षांत देश कसा पाहिजे, याबाबत त्यांनी नियोजनाला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी दीर्घकाळासाठी मुख्यमंत्री राहिलो आहे. सतत निवडणुका आणि आचारसंहिता असल्याने माझ्या राज्यातील चांगले अधिकारी दुसऱ्या राज्यात निरिक्षक म्हणून इलेक्शन ड्युटीला जायचे. त्यामुळे मला चिंता असायची की माझं राज्य कसं चालवू? कारण सतत कुठे ना कुठे निवडणुका असायच्या आणि अधिकारी जात असत. परंतु, ही माझी सुट्टी नसायची. मी निवडणुका सुट्ट्यांप्रमाणे लढवत नाही. मी तेव्हाही शंभर दिवसांचं प्लानिंग करायचो. निवडणुकीला उतरण्याआधी अधिकाऱ्यांना कामाला लावलं. “मी निवडणुकीत जाण्याआधीच तयारीला लागलो आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून २०४७ ला डोक्यात ठेवून काम करतोय. त्यासाठी देशभरातील लोकांच्या सूचना मागवल्या. १५ लाखांहून अधिक लोकांनी याबाबत सूचना पाठवल्या आहेत. येणाऱ्या २५ वर्षांत भारत कसा पाहिजे यावर नागरिकांचे निवेदन घेतलं आहे. विविध विद्यापीठ, संस्थांना एकत्रित केलं. १५-२० लाख लोकांनी यावर अहवाल दिला. मग एआयच्या मदतीने त्याचं विभाजन केलं”, असं मोदी म्हणाले. -
पुढील २५ वर्षांसाठी अधिकाऱ्यांची टीम
“विभाजनानंतर प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची टीम पुढील २५ वर्षांसाठी बनवली. अधिकाऱ्यांकडून या कामासाठी मी प्रेझेंटनेश घेतलं. प्रत्येक विभागवार दोन-अडीच तास चर्चा केली. मला वाटतं की मी हे काही कागदपत्र बनवतो आहे, हे व्हिजन मोदींची पोपटपंची नाहीय. १५-२० लाख लोक इन्पुट देत आहे म्हणजे संपूर्ण देशाचा यात समावेश आहे”, असंही ते म्हणाले .निवडणूक झाल्यानंतर हा अहवाल राज्यांना पाठवला जाणार. मग राज्यात यासंदर्भात चर्चा होईल. राज्यातून अहवाल आल्यानंतर यावर निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर व्यापक चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल”, असं मोदींनी स्पष्ट केलं. -
ईडी कारवायांबद्दल काय म्हणाले?
“ईडीकडे आत्ता किमान ७ हजार प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यात राजकीय व्यक्तींशी संबंधित प्रकरणं ३ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. जेव्हा त्यांचा कार्यकाळ होता, तेव्हा १० वर्षांत त्यांनी फक्त ३५ लाख इतकी रोख रक्कम पकडली. आम्ही तब्बल २२०० कोटी रुपये इतकी रक्कम पकडली आहे. नोटांचा ढीग पकडला जातोय. वॉशिंग-मशीनमध्येही नोटा सापडत आहेत. काँग्रेसच्या खासदाराकडून ३०० कोटी मिळाले. बंगालमध्ये मंत्र्यांच्या घरातून मोठी रोकड मिळाली. हे जेव्हा दिसतं, तेव्हा देशातली जनता हे सगळं सहन करायला तयार आहे का? जनता म्हणते हा आजार जायला हवा.” -
निवडणूक रोख्यांसंदर्भात काय म्हणाले?
निवडणूक रोख्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, “जर निवडणूक रोखे नसते तर अशी कोणती व्यवस्था होती की, कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे कळले असते. या देशात तीन हजार कंपनीने निवडणूक रोखे दिले आहेत. यातील २६ कंपन्या अशा आहेत, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. यातील १६ कंपन्या अशा होत्या, ज्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले होते. निवडणूक रोख्यांमध्ये फक्त ३७ टक्के पैसे हे भाजपाला मिळाले आहेत. उतरलेले ६३ टक्के पैसे विरोधी पक्षाला मिळाली आहेत. पण निवडणूक रोखे होते म्हणून आपल्याला पैशांचा माग काढता आला, म्हणजे कोणत्या कंपनीने दिले? कसे दिले? कुठे दिले? त्यामुळे मी म्हणतो की, प्रामाणिकपणे कधी विचार केला तर सगळ्यांना पश्चाताप होईल (निवडणूक रोखे रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर)”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. -
एलॉन मस्क यांच्या भारतातील गुंतवणुकीवर काय बोलले?
“एलॉन मस्क हे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत, हा एक भाग झाला. पण ते भारताचेच समर्थक आहेत. मला भारतात गुंतवणूक पाहिजे आहे. पैसा किसी का भी लगा हो, पसिना मेरे देश का लगना चाहीए. (पैसा कोणाचाही लागला तरी घाम म्हणजेच मेहनत माझ्या देशाची असली पाहिजे) त्याला माझ्या देशातील मातीचा वास आला पाहिजे, जेणेकरून माझ्या देशातील तरुणांना रोजगार मिळेल,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. -
राम मंदिर निर्माण आणि उद्घाटनावर काय म्हणाले?
“राम मंदिराच्या घटनेचे आम्ही राजकारण करत नाहीत. आमचा जन्मही जेव्हा झाला नव्हता. आमचा पक्षही जेव्हा स्थापन झाला नव्हता. तेव्हाच हा विषय न्यायलयात निकाली काढला जाऊ शकत होता. तेव्हाच समस्या सुटली असती. भारताची फाळणी झाली, तेव्हाही काही गोष्टींची स्पष्टता आणून हा प्रश्न सोडविला जाऊ शकत होता. पण तो सोडवला गेला नाही. मतपेटीच्या राजकारणासाठी या विषयाचा शस्त्राप्रमाणे वापर केला गेला. यासाठी हा विषय मार्गी न लावता त्याला पुन्हा पुन्हा हवा दिली गेली. एवढेच नाही तर न्यायालयात यावर निर्णय होऊ नये, म्हणून अडचणी निर्माण केल्या गेल्या”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. -
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “सोमनाथ मंदिरापासूनच्या पुढील सर्व घटना पाहा. भारताच्या मुळ पिंडाला त्यांच्याकडून विरोध करत आले आहेत. सोमनाथ मंदिराच्या वेळीही तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना जाऊ दिले नाही. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण धुडकावून तुम्हाला काय मिळाले? तुमच्या सर्व जुन्या चुका बाजूला ठेवून घरी येऊन तुम्हाला निमंत्रण दिले, तरी तुम्ही त्याला फेटाळून लावले. यापेक्षा मोठी चूक काय असू शकते?”
-
विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण धुडकावले असले तरी मला जेव्हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जायचे होते, त्याआधी मी बरीच तयारी केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मी काही संताशी चर्चा केली. वाचन केले, असे ते म्हणाले. अनेकांशी सल्लामसलत केल्यानंतर ११ दिवसांचे अनुष्ठान करण्याचा मी निर्णय घेतला होता. ते ११ दिवस मी जमिनीवर झोपलो. प्रभू राम ज्या ज्या ठिकाणी गेले होते, त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
-
“राम मंदिर उभारण्यासाठी देशातील गोरगरिबांनी पै-पै जमा केली. या मंदिर निर्माणातून मी चार महत्त्वाच्या गोष्टींकडे पाहतो. एक म्हणजे ५०० वर्षांचा अविरत संघर्ष, दुसरे म्हणजे लांबलचक न्यायिक लढा, तिसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि चौथा म्हणजे लोकांनी एक एक पैसा गोळा करून हे मंदिर उभारले. यासाठी सरकारी खजिन्याचा वापर झालेला नाही. या गोष्टी पुढच्या कैक वर्षांपर्यंत लोकांना प्रेरणा देत राहतील,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
वन नेशन, वन इलेक्शन बद्दल काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वन नेशन वन इलेक्शन ही आमची कटिबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली. याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल”. (All Photos- ANI)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे