छत्रपती संभाजीनगरची (औरंगाबाद) जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्याला संधी दिली आहे.राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेचं तिकीट दिलं आहे.महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने या मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं तरी महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत.राज्यातल्या अनेक जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपात रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्यातरी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)च्या जागेचा तिढा सोडवण्यात महायुतीला यश मिळालं आहे.त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन शिवसैनिक भिडणार आहेत.या मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे खासदार (छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.त्यामुळे आता या तिरंगी लढतीत कोण कोणाला मात देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.