-
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांत मतदान सुरु आहे.
-
पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला, आता या टप्प्यात अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ मतदारसंघांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आज २६ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील ५ जागांवर आणि मराठवाड्यातील ३ जागांवर हे मतदान सुरु आहे.
-
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा व यवतमाळ-वाशीम या जागांवरील उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली या जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
-
अमरावती
अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे करणार आहेत. याशिवाय बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब हे उमेदवार अमरावतीच्या मैदानात उतरवले आहेत. -
अकोला
अकोला मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपा उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. -
बुलढाणा
बुलढाणा, आणि यवतमाळ-वाशीम या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत यावेळी शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी लढत होत आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा पक्षाने बुलढाण्यातून मैदानात उतरवले आहे. त्यांना शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते नरेंद्र खेडेकर यांनी आव्हान दिले आहे. -
यवतमाळ-वाशीम
यवतमाळ-वाशीम येथून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी होत आहे. -
वर्धा
वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यंदा आपली हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्याशी होत आहे. -
परभणी
परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे विद्यमान खासदार संजय जाधव मैदानात आहेत. -
नांदेड
नांदेडमध्ये भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकरांना काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांचं आव्हान आहे. -
हिंगोली
हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर विरुद्द शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर लोकसभेच्या मैदानात आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा