-
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांची रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.
-
“कोकणात मला प्रचार करायची गरजच नाही कारण कोकण हे शिवसेनेचं आणि ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही तुम्ही जागच्या जागी उभे आहात, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. गद्दाराला शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण दिला आहे. पण काय घडलं बघा की कोकणातून धनुष्यबाणही गायब केला आहे. गद्दारांना कळलंच नाही गद्दारांचे मालक शिवसेनेचं कोकणाचं नातं तोडायला निघाले आहेत.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
-
भाजपाच्या विरोधात लाव्हा उसळला आहे
“भाजपाच्या विरोधात कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लाव्हा रस उसळून आला आहे. सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. आयपीएलमध्ये नाही का खेळाडू एका टीममधून दुसऱ्या टीम दुसऱ्या टीममध्ये जातो तसं भारताच्या राजकारणाचं झालं आहे. आयपीएल इंडियन पॉलिटिकल लीग.” -
“मोदी कितीही काही बोलतील पण २०१४ आणि २०१९ चा आत्मविश्वास मला दिसतच नाही. २०१९ मध्येही आपण फसलो होतो. तेव्हा रुबाब होता कारण शिवसेना बरोबर होती, त्यावेळी ५६ इंची छाती होती आता त्यातली हवाही गेली कारण आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी अशी गत झाली आहे. आता अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. ही सगळी काय गत केली भाजपाची असं त्यांच्या आत्म्याला वाटत असेल.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार भाजपाचा झाला आहे. भाजपाचा विनाश होतो आहे त्यामुळेच शिवसेनेला त्यांनी बाजूला केलं असावं. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. समोर जो आहे त्याला टोप घालण्यापूर्वी आज कुठल्या पक्षात आहोत ते आठवावं लागतं असा टोला उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना लगावला. लघू किंवा सूक्ष्म प्रकल्प कोकणात त्यांनी आणला का ? निवडणुकीनंतर करोनाचा जिवाणू दिसेल पण हे दिसणार नाहीत अशी अवस्था आहे. असं ते म्हणाले.
-
शिवसेना नसती तर गुंडगिरी सुरु झाली असती
आज हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण बाळासाहेबांनी जोडलेले शिवसैनिक माझ्याच बरोबर आहेत. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तुम्ही आम्हाला घराणेशाही म्हणत आहात “आमची घराणेशाही लोकांना मान्य आहे. यांना शिवसेनेची घराणेशाही नकोय पण तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. काय भाषणं ते करत आहेत? फडणवीस येऊन गेले आणि सांगून गेले की यांना मत म्हणजे त्यांना मत. तुमच्या बरोबर शिवसेना नसती तर इथे गुंडगिरी सुरु झाली असती. भाजपा इथे काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. -
गद्दारांना मत म्हणजे विनाशाला मत, इंडिया आघाडीला मत म्हणजे विकासाला मत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनाही उत्तर दिलं आहे.
-
यावेळी कोकणातील बारसू आणि जैतापूर प्रकल्पांचा उल्लेख करून ते म्हणाले की, “विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आंदोलने झाली तेव्हाही मी येथे आलो होतो. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी कशा पद्धतीने मारहाण केली हे पाहिले आहे. जैतापूर प्रकल्पाच्या विरोधकांवर गोळीबार झाला होता. त्यावेळी शिवसेना मध्ये पडली नसती तर आज हे प्रकल्प पुढे रेटले गेले असते.”
-
“आता सिडकोच्या माध्यमातून कोकणच्या किनारपट्टीवरील गावांचा ताबा घेऊन येथील निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव शिजत आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. आपले सरकार आल्यानंतर बारसू जैतापूर यासारख्या विनाशकारी प्रकल्पांना कोकणात थारा दिला जाणार नाही.” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
-
(सर्व फोटो साभार- शिवसेना फेसबुक पेज)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा