-
कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात, पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढाई पाहायला मिळणार आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी केंद्रीय अवजड उद्याोग मंत्री अनंत गीते यांच्यात सामना होणार आहे.
-
दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. यामुळे तिसरी लढत उभयतांसाठी महत्त्वाची आहे.
-
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत गीते विरुद्ध तटकरे अशा लढतीचा पहिला अंक पार पडला होता. देशभरात मोदी लाट असताना सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवले होते.अटीतटीच्या लढतीत गीते जेमतेम दोन हजार मतांनी निवडून आले होते. तेव्हा सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला जवळपास नऊ हजार मते मिळाली होती.
-
२०१९ मध्ये पुन्हा एकदा देशात मोदी लाटेचा प्रभाव होता. मात्र यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता. म्हणजेच या दोन्ही निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा दिसून आला नाही.
-
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून शेकाप आणि काँग्रेसचे खासदार मतदारसंघातून निवडून येत असत. पण काळानुरूप मतदारसंघात दोन्ही पक्षांची वाताहत झाली. त्यांची जागा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली आहे.
-
शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची साथ तटकरे यांच्यासाठी जमेची आहे. मात्र त्याच वेळी मुस्लीम आणि बहुजन मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. तटकरे यांना शेकापची साथही यंदा मिळणार आहे. मात्र त्याच वेळी शिवसेनेत पडलेली उभी फूट, विरोधी पक्षांचा सातत्याने घटणारा प्रभाव गीतेंसाठी अडचणीचा असणार आहे.
-
मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहणार यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना ठाकरे गटातही सारे आलबेल नाही. गेल्या आठवड्यात भास्कर जाधव आणि गीतेंमध्ये व्यासपीठावर चकमक झाली.
-
वंचित बहुजन आघाडीने कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. पण सध्यातरी त्या मतदारांवर कितपत प्रभाव पाडतील याबाबत साशंकता आहे.
-
(सर्व फोटो साभार- अनंत गीते, सुनील तटकरे फेसबुक पेज)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई