-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (३ मे) कणकवली येथे जाहीर सभा घेऊन भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. (सर्व फोटो साभार- शिवसेना फेसबुक पेज)
-
भाजपावर टोलेबाजी
“हे लोक (भाजपा) आता देशातील महत्त्वाचे प्रश्न विसरून गेले आहेत. फक्त काँग्रेसवर टीकाटिप्पणी चालू आहे. मोदी म्हणतायत, ‘आता काँग्रेस काय करणार? काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेणार आणि ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांच्यात वाटून टाकणार’. मुळात तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत, त्यावर आम्ही काय करू शकतो? त्यात आमचा काय दोष?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. -
उद्ध ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत म्हणून तुम्ही आमची मुलं कडेवर घेऊन फिरत आहात. ते करताना भाजपाचं कचरा उचलणाऱ्या गाडीसारखं झालंय. या निवडणुकीत भाजपाची कचरा उचलणारी गाडी फिरतेय. मी असं कधीच पाहिलं नव्हतं. पण भाजपाच्या काळात हे पाहायला मिळतंय. त्यांनी चक्क कचऱ्याचं प्रदर्शन लावलं आहे. सगळा कचरा त्यांनी जमा केला आहे.”
-
ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, बाळासाहेब ठाकरे ज्याला ‘गेट आउट’ म्हणाले होते, त्यालाच भाजपाने इथला उमेदवार केलं आहे.”
-
“त्याचीदेखील (नारायण राणे) अशीच मस्ती होती. तुला बघून घेतो… तुझं अमुक करतो… तू माझं काय वाकडं करणार आहेस… मी त्याला आजही सांगेन गेट आउट… काय करायचं ते कर आणि मुळात तू कोणाला धमक्या देतोस? या धमक्यांना कोकणवासीयांनी केव्हाच गाडून टाकलं आहे.” अशा शब्दात ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
-
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, “२००५ चा काळ एकदा आठवून पाहा. तेव्हा पोटनिवडणूक होती आणि इथे दहशतीचं वातावरण होतं. त्या काळात मी इथल्या वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवर फिरत होतो. तिथे लोकांमध्ये याची भीती होती. मला आजही आठवतं की तुमच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले. मी इथून जात असताना माझी गाडी थांबवली आणि मला म्हणाले, उद्धवजी एक काम करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, फक्त इथे कोणीतरी लढणारा माणूस द्या. कारण तुम्ही आज इथून गेल्यावर उद्या हे लोक काय करतील ते सांगता येत नाही.”
-
“आमची मुलं-बाळं, आमच्या मुली, महिला इथल्या रस्त्याने ये-जा करतात. ते लोक काय करतील काही सांगता येत नाही. त्यानंतर याच लोकांमधून वैभव नाईक उभा राहिला. विनायक राऊत उभे राहिले आणि तुम्ही (जनता) त्यांच्याबरोबर उभे राहिलात.”
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “मागे इथे एक हत्या आणि अपहरणांची मालिका चालू होती… ती मालिका श्रीधर नाईकांपासून सुरू झाली होती, सत्यविजय भिसे, आमचा रमेश गोवेकर एक दिवस गायब झाले. अंकुश राणे हेदेखील त्यापैकी एक. संपूर्ण मालिका इथल्या लोकांना माहिती आहे. हत्या झाल्या, लोक पळवले गेले, परंतु कोणी पळवलं तेच माहिती नाही. मुळात असं होऊ शकतं का? ही काय भुताटकी आहे का? आणि हे सगळं अमित शाह यांना माहित नाही का?”
-
“आता जर ते म्हणत असतील की नारायण राणेंना मत म्हणजे मोदींना मत, तर गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असं होईल. अमित शाह आता केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांनी या हत्यांचा शोध लावावा. पण त्यांना असे काही धागेदोरे मिळणारच नाहीत. कारण जो जो भाजपात गेला तो यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन चकाचक होऊन बाहेर पडला असं यांना वाटतं. परंतु, यांनी केलेली पापं इथले लोक विसरलेले नाहीत.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राणेंना घेरल्याचे पाहायला मिळाले.

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या