-
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात अधिक जागा पदरात पाडून करू, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना दिले. (All Photos- Express photo by Ganesh Shirsekar)
-
तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोण, असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा भविष्याचा विचार करता अजित पवारांनाच अधिक पसंती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, ही फूट पडण्यामागची कारणमीमांसा, शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात दवडलेली संधी, अजित पवार गटाचे भवितव्य आणि राष्ट्रवादीत काका-पुतणे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता यावर प्रफुल पटेल यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात सविस्तर भाष्य केले.
-
“लोकसभेत सारासार विचार करूनच आम्ही कमी जागा स्वीकारल्या. आमची जास्त जागांची मागणी होतीच, पण तीन पक्षांमध्ये जागावाटप करताना अनेक अडचणी होत्या. हे लक्षात घेऊनच आम्ही अधिक ताणून धरले नाही.”
-
“राष्ट्रवादीचे उमेदवार चार मतदारसंघांमध्ये लढत आहेत. परभणीची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडली. साताऱ्याच्या जागेवर आमचा दावा होता, पण उदयनराजे यांच्यासाठी ही जागा आम्ही सोडली. पण त्याबदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन भाजपने आम्हाला दिले आहे. याचाच अर्थ आम्हाला सहा जागा मिळाल्या आहेत”, असे पटेल यांनी सांगितले.
-
पटेल म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या शिंदे गटाचे १३ खासदार असल्याने त्यांना १५ जागा मिळाल्या. आमचा एकच खासदार असतानाही अधिकच्या जागा मिळाल्या आहेत. लोकसभेला कमी जागा स्वीकारल्या असल्या तरी त्याची भरपाई विधानसभेच्या वेळी नक्कीच केली जाईल. तशी चर्चा आम्ही जागावाटपाच्या वेळी भाजपच्या नेतृत्वाशी केली आहे. ही चर्चा झाल्यावरच लोकसभेसाठी कमी जागा स्वीकारल्या आहेत.’’
-
अजित पवार यांनी ९० जागा लढवू, असे विधान यापूर्वी केले होते. तेवढ्या जागा मिळतील का, या प्रश्नावर, ‘‘नक्की किती जागा मिळतील हे आताच सांगता येणार नाही. पण लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी नक्की केली जाईल,’’ असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
-
अजित पवार यांनी ९० जागा लढवू, असे विधान यापूर्वी केले होते. तेवढ्या जागा मिळतील का, या प्रश्नावर, ‘‘नक्की किती जागा मिळतील हे आताच सांगता येणार नाही. पण लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी नक्की केली जाईल,’’ असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
-
“राष्ट्रवादीत फूट पडल्यावर ४३ आमदारांनी आम्हाला साथ दिली. यावरून अजित पवार यांचे नेतृत्व आमदारांना मान्य आहे, हे सिद्ध होते. सामान्य कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. भविष्याचा विचार करता तरुण पिढी तसेच राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते हे अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांचा आम्हाला अधिक पाठिंबा असल्याचे निदर्शनास आले आहे.”
-
“उद्या शरद पवार की अजित पवार असा प्रश्न निर्माण झाला तर अजित पवारांनाच अधिक पाठिंबा मिळेल. शरद पवार हे वर्तमानातील नेते आहेत तर भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल. शरद पवार यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आजही आदराची भावना आहे. मी तर कधीच पवारांच्या विरोधात मतप्रदर्शन करणार नाही,” असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
-
शरद पवारांबद्दल ‘ते’ गूढ कायम
“शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत काही संधी गमावल्या आहेत. १९९६ मध्ये देवेगौडा यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी आली होती. काँग्रेसच्या खासदारांचा पवारांना पाठिंबा होता. २००४ मध्ये राज्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीला राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू शकले असते. पण या दोन्ही संधी शरद पवार यांनी का गमावल्या हे गूढ कायम आहे. याबद्दल मी त्यांच्याकडे अनेकदा विचारणा केली, पण त्यांनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले.” -
मुख्यमंत्रीपदाची संधी आली तेव्हा अजित पवार हे मुख्यमंत्री झाले नसते तर छगन भुजबळ वा आर. आर. पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळाली असती असे पटेल यांनी सांगितले. अजित पवार यांच्याकडे राज्याचे, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व सोपविले असते तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसती, असेही पटेल म्हणाले.
-
राज्यात मोदींची लोकप्रियता कायम
राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीला ३७ ते ३८ जागा नक्कीच मिळतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या काळात राज्यभर फिरताना मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे जाणवले आहे. राज्यात महायुतीला कमी जागा मिळतील, अशी चर्चा सुरू असली तरी त्यात तथ्य नाही. ही राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक आहे. मोदींना पर्याय नाही. अशा वेळी मतदार मोदी यांनाच प्राधान्य देतील. -
“प्रचाराच्या काळात राज्यभर फिरताना मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे जाणवले आहे. राज्यात महायुतीला कमी जागा मिळतील, अशी चर्चा सुरू असली तरी त्यात तथ्य नाही. ही राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक आहे. मोदींना पर्याय नाही. अशा वेळी मतदार मोदी यांनाच प्राधान्य देतील.”
-
राज्यात महाविकास आघाडीला फारसे यश मिळणार नाही. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय दिसला नाही. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच निवडून येतील, असा दावाही पटेल यांनी केला.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”