-
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत”, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
-
“छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा. भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, अशी टीका सुहास कांदे यांनी केली.
-
नाशिकमधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
-
दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, यावेळी कांदे यांनी जाहीरपणे हा आरोप केल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील महायुतीमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
-
सुहास कांदे यांच्या आरोपानंतर छगन भुजबळ यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. आमदार काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा, असे त्यांनी सांगितले.
-
सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद नवीन नाही. याआधीही दोन्ही नेते एकमेकांना भिडले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुहास कांदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असतानाही दोन्ही नेत्यांमध्ये जाहीर वाद झाले होते.
-
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर आणि सुहास कांदे शिंदे गटाबरबोर राहिल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपापसातील वाद मिटवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला आहे.
-
नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी याआधी त्यांच्या मतदारसंघाला पालकमंत्री भुजबळ यांनी पुरेसा जिल्हा नियोजन निधी दिला नसल्याचा आरोप केला होता.
-
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद छगन भुजबळ यांच्याकडून काढून घ्यावे अशी मागणी कांदे यांनी महाविकास आघाडीत असताना केली होती. (सर्व फोटो छगन भुजबळ आणि सुहास कांदे या फेसबुक पेजवरून साभार.)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?