-
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही प्रणाली ४५ मिनिटे बंद होती, असा दावा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
-
त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
-
ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणं ही बाब संशयास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
-
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळी ४५ मिनिटे बंद होते. ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणादेखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. तसेच या ठिकाणी टेक्निशियनदेखील उपलब्ध नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. -
पुढे बोलताना या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही सुळेंनी केली.
-
आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणीदेखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला, याची कारणे जाहीर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
-
निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण :
दरम्यान, याप्रकरणी आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. -
“कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशियन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे,” असे त्या म्हणाल्या.
-
(सर्व फोटो सुप्रिया सुळे फेसबुक पेजवरून साभार.)

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज