भाजपामध्ये मोठी कारकिर्द घालवलेल्या एकनाथ खडसेंनी २०१९ साली मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची आमदारकीही दिली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपावासी झाले आहेत. खडसे यांचा अद्याप अधिकृत प्रवेश झाला नसला तरी ते मात्र भाजपाच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. एकनाथ खडसे यांच्या निर्णयाबाबत आता त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“आयुष्यात कधी कधी जबाबदारीला अधिक महत्त्व द्यावं लागतं. आज निखीलदादा हयात नाहीत. रक्षाताई एकट्या आहेत. त्यामुळे कदाचित एकनाथ खडसेंनी जबाबदारीतून हा निर्णय घेतला असावा.”“कारण त्यांचे आणि माझे याबाबतीत काही बोलणे झालेले नाही. आपला मुलगा हयात नाही, त्यामुळे सासरे म्हणून त्यांची जबाबदारी त्यांना महत्त्वाची वाटत असावी. आज जर निखीलदादा असता तर परिस्थिती वेगळी असती”, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेताना एकनाथ खडसेंना थांबविले का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता रोहिणी खडसे म्हणाल्या की, “एकनाथ खडसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात जे काम केले आहे, त्यावरून त्यांना माझ्या सल्ल्याची काही आवश्यकता आहे, असे मला अजिबात वाटत नाही.”“मला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षातच काम करायचे आहे. त्यामुळे आमचे या विषयाबाबत काहीही बोलणे झालेले नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत माध्यमांशी संवाद साधला. “मी भाजपामध्ये परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्याबरोबर रोहिणी खडसे यांनाही परत येण्याचा सल्ला दिला होता.”“मात्र त्यांनी राष्ट्रवादीत राहूनच काम करणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढे माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी सध्या विधानपरिषदेचा आमदार असून माझी टर्म बाकी आहे. . शरद पवार यांनी मला राजीनामा देण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. मी निवडणूक लढविणार नसलो तरी मी राजकारणातून मात्र निवृत्ती घेतलेली नाही”, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.(सर्व फोटो रोहिणी एकनाथराव खडसे फेसबुक पेजवरून साभार.)हेही पहा- ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर निवडणूक अधिकार…