-
शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गटांबाबत (एकनाथ शिंदेंचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट) वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
-
खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद चालू होता तेव्हापासून अधून-मधून राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होत आहे.
-
राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अधून मधून राज ठाकरेंशा भेटत असतात.
-
गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएतील प्रमुख नेते अमित शाहांची भेट घेतली होती.
-
पाठोपाठ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा दर्शवला.
-
दरम्यान, पुन्हा एकदा राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
-
राज ठाकरे यांनी नेहमीच “असं काही होणार नाही, मी माझा पक्ष सांभाळेन, मला माझी स्वतःची मुलं कडेवर घेऊन फिरायचं आहे”, अशा प्रकारची उत्तरं देत आहेत. मात्र राज यांच्याबद्दलची चर्चा थांबलेली नाही.
-
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
-
आंबेडकर यांनी काल (१६ मे) एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “नजिकच्या काळात राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात.”
-
यावेळी आंबेडकर यांनी वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. आंबेडकर म्हणाले, “या लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्याच्या टप्प्यात तो अपयशी झाला आहे.”
-
त्यानंतर आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं भवितव्य काय? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “याबद्दल मी काही बोललो तर तुम्ही म्हणाल की मी खूप मोठं वक्तव्य केलं आहे.”
-
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असं जाणवू लागलं आहे की नजिकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील. सध्या तसं चित्र दिसू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आलं आहे. म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. राज ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रमुख होतील. मला तशी शक्यता दिसत आहे. मला स्वतःलाही त्याबद्दल थोडी उत्सुकता आहे.”
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”