-
आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज ६२वी जयंती. त्यानिमित्त निखळ सौंदर्याची खाण असलेल्या स्मिता यांच्या जीवनावर एक झलक टाकूया.
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. -
अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.
वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. -
त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले.
स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते. -
'जैत रे जैत' चित्रपटातील दृश्य.
फ्रान्समध्येला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. ऱाष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना स्मिता पाटील. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. मराठी व हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर दोन दशके अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. -
वृत्तनिवेदिका म्हणून काम करत असतांना श्याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये 'चरणदास चोर' या चित्रपटात घेतले. पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
-
१९७०-८० च्या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली. समाजातील अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. मुळात स्मिता या एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी कळवळा होता.
-
१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन चित्रपट यशस्वी झाले. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसिरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला.
-
स्मिता यांनी स्त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यामुळे 'मिर्च मसाला'मधील सोनबाई, 'अर्थ'मधील कविता सान्याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील 'उंबरठा' चित्रपटातील सुलभा महाजन म्हणजे जणूकाही आपल्या मनातली एक भावना आहे, असे त्याकाळी अनेक महिलांना वाटलं.
निर्माता डी रामा नायडू, स्मिता पाटील, किशोर कुमार, संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी आणि दिनेश या छायाचित्रात दिसत आहेत. -
समांतर चित्रपटांनंतर त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटही केले. 'शक्ती', 'नमकहलाल' हे त्यांचे व्यावसायिक चित्रपटही सुपरहिट झाले. श्याम बेनेगल, रमेश सिप्पी, बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्दर्शकांना स्मिता या आवडत्या अभिनेत्री होत्या.
-
स्मिता पाटील यांचे खासगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिले.
-
स्मिता पाटील यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते.
-
स्मिता यांच्यावर राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. नादिरा बब्बर या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
-
नसीब नी बलिहारे चित्रपटात नसिरुद्दीन शहा आणि स्मिता पाटील.
-
स्मिता पाटील यांनी चित्रपटांच पारंपरिक पद्धतीच्या भूमिका साकारल्या. मात्र खासगी आयुष्यात स्मिता या खूपच बिनधास्त होत्या. दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला असताना त्या जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जात असत. मात्र बातम्या देताना जीन्सवरच साडी परिधान करायच्या असे म्हटले जाते.
-
असं म्हणतात की, स्मिता यांचे डोळे खूप बोलके होते. तिच्या नजरेत वेगळी चमक होती. वाचिक अभिनयाबरोबरच डोळ्यांच्या माध्यमातून सांकेतिक अभिनय करण्यातही त्यांचा हातखंडा होता.
शत्रुघ्न सिन्हा, सुनील आनंद आणि देव आनंद यांच्यासह विनोदावर खळखळून हसताना स्मिता पाटील. -
'चक्र'मधील अम्मा ह्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी स्मिता यांना ‘सुवर्णकमळ’ मिळाले होते. त्यांना अभिनयाबद्दल राज्य व राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा प्राप्त झाले होते.
प्रतिक बब्बर हा स्मिता आणि राज यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच स्मिता या कोमात गेल्या होत्या. १३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. 'शिव छत्रपती'या चित्रपटातील स्मिता यांचे छायाचित्र. -
२००९ साली स्मिता पाटील यांचे वडिल शिवाजीराव पाटील आणि बहिण अनिता पाटील देशमुख यांच्या हस्ते स्मिता यांच्या आयुष्यावरील पुस्तकाचे उदघाटन करण्यात आले होते.
-
विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार, सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजची प्रत्येक अभिनेत्री जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, 'अशी स्मिता पाटील आता होणे नाही' हेच खरे..
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ