-
सन्मान स्त्रीच्या लढण्याचा , गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात येतो.
-
यावर्षी आदिवासींची घरठाणाची चळवळ चालवणा-या डॉ. वैशाली पाटील, दृष्टीहिन तथा गतीमंद मुलामुलींची शाळा चालवणा-या प्रमिला कोकड, रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर, घनकचरा व्यवस्थापन आणि वेस्ट मॅनजमेंटमधून रोजगार निर्मिती करणा-या निर्मला कांदळगावकर, आपल्या अभिजात साहित्याने मराठी साहित्यक्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणा-या अरुणा ढेरे, न्युरोसायन्ससारख्या विषयात आपल्या संशोधनाची पताका फडकविणा-या डॉ. विदिता वैद्य यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
-
कार्यक्रमाचा भावोत्कट क्षण ठरला गौरी सावंत यांच्या पुरस्कार प्रदानाचा. समाजासाठी बहिष्कृत असलेल्या किन्नर समाजाचं प्रतिनिधीत्व करत त्यांच्या हक्काचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून गौरी सावंत लढतायत. स्वतः हे भीषण जगणं अनुभवलेल्या गौरीने आपलं मनोगत व्यक्त केलं तेव्हा उपस्थित प्रत्येकजण सुन्न झाला होता.
-
गौरी सावंत म्हणाल्या की, 'आम्हाला येथील समाजाने कायम चार हात लांब ठेवलेलं आहे. आम्ही सिग्नलवर किंवा ट्रेनमध्ये दिसलो की लोकं आमच्याकडे तिरस्काराने बघतात. ते विचारतात की तुम्ही काही करत का नाही? माझा त्यांना प्रश्न आहे तुम्ही आमच्यासाठी काही का नाही करत? फार काही करु नका फक्त आमच्याकडे सामान्य माणसासारखं बघा एवढं केलं तरी तेच खूप असेल.'
-
या कार्यक्रमात सादर झालेल्या विविध कलाकारांच्या नृत्य सादरीकरणानेही उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक आणि उमेश कामत यांनी तर कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्षितिज पटवर्धनने केलं.
-
पुरस्कारांच्या निवड समितीची जबाबदारी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ.स्नेहलता देशमुख यांनी पार पाडली.
-
येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य