-
श्रीदेवी… बसं नाम ही काफी है, असं म्हटलं तरी हरकत नाही. श्रीदेवी यांनी अचानक घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. 'सोलवा सावन', 'सदमा', 'नागिन' ते 'इंग्लिश विंग्लिश' अशा सर्वच सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी बऱ्याच भूमिका आपल्या दमदरा अभिनयाने अजरामर केल्या पण काही असेही चित्रपट आहेत, ज्यांची ऑफर त्यांनी नाकारली होती. मात्र हेच चित्रपट बॉक्स ऑफीसवर खूप गाजले. अशाच काही गाजलेल्या पण श्रीदेवी यांनी नाकारलेल्या सिनेमांची यादी…(माहिती सौजन्य- श्रीदेवी डॉट बिझ)
-
कामयाब (१९८४) – जितेंद्रची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमामध्ये दुय्यम दर्जाची भूमिका श्रीदेवी यांनी नाकारली होती. पद्मालया प्रॉडक्शनला श्रीदेवी यांचा हा नकार न पटल्याने त्यांनी राधा नावाच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीला या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत लॉन्च केले. या सिनेमाच्या पोस्टवर मात्र श्रीदेवीचे नाव होते. या पोस्टरवरील टॅग लाईन होती ‘ती श्रीदेवी नाही ती राधा आहे.’ या अशा प्रमोशनमुळे श्रीदेवीं यांची आई निर्मात्यांवर चांगलीच भडकली होती.
-
होशियार (१९८५)- 'होशियार'मध्ये श्रीदेवी यांनी नाकारलेली भूमिका नंतर मिनाक्षी शेशाद्रीने साकारली. अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास श्रीदेवीने नकार दिल्याने आणि निर्माता-दिग्दर्शकांशी न पटल्याने काही दृष्ये रेकॉर्ड केल्यानंतर श्रीदेवीने हा सिनेमा करण्यास नकार दिला.
-
जाँबाज (१९८६)- धक्का बसला ना या यादीत हे नाव वाचून? ‘हर किसी को नही मिलता, यहा प्यार जिंदगी मै’ या गाण्यातील लाल रंगाच्या शिफॉनच्या साडीमधील श्रीदेवीची अदाकारी त्याकाळात अनेकांना वेड लावून गेली आणि हे गाणे अजरामर झाले. मात्र त्यांना केवळ एका गाण्यापुरते या सिनेमात न घेता मुख्य भूमिकेसाठी साईन करण्याचा हट्ट अभिनेते फिरोज खान यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांकडे केला होता. मात्र अंगप्रदर्शन करणार नाही असं सांगत श्रीदेवी यांनी हा सिनेमा नाकारला आणि खास श्रीदेवीला लक्षात घेऊन लिहिण्यात आलेल्या सीमाची व्यक्तीरेखा नंतर डिम्पल कपाडीयाने साकारली.
-
अजूबा (१९९१)- सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक शशी कपूर यांना श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्या सोबतीने या सिनेमात काम करावे असे वाटत होते. मात्र या सिनेमातील भूमिका न पटल्याने श्रीदेवीने स्पष्ट शब्दात कपूर यांना नकार दिला. तसेच त्या काळात यशाच्या शिखरावर असणाऱ्या अमिताभ आणि श्रीदेवीला एकत्र सिनेमासाठी साईन करणे निर्मात्यांना मानधनाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नव्हते. या काळात श्रीदेवीला अमिताभ यांच्याबरोबर ऑफर करण्यात आलेली प्रत्येक भूमिका तिने नाकारली होती. कारण अमिताभ यांना देण्यात येणाऱ्या मानधनाइतके मानधन आणि तितकीच महत्वाची भूमिका असेल तरच मी काम करेन असे श्रीदेवीचे म्हणणे होते.
-
बेटा (१९९२)- या सिमेनातील मुख्य नायिकेची व्यक्तीरेखा श्रीदेवीला लक्षात घेऊन साकारण्यात आली होती. मात्र दोन मुख्य कारणांसाठी श्रीदेवीने ही भूमिका नाकारली. आधीच हातात असलेल्या काही सिनेमांचे चित्रीकरण संपवणे महत्त्वाचे होते, हे झाले पहिले कारण. तर दुसरे कारण म्हणजे या सिनेमाच्या आधी श्रीदेवीने अनिल कपूरसोबत काही सिनेमे स्वीकारले होते. त्या यादीत आणखी एकाची भर नको म्हणून तिने हा सिनेमा नाकारला. श्रीदेवीने नाकारलेली भूमिका नंतर माधुरी दीक्षितने साकारली. त्या काळी हा सिनेमा जबरदस्त हीट ठरला होता.
-
डर (१९९३)- यश चोप्रा यांचा श्रीदेवीने नाकारलेला आणखी एक सिनेमा म्हणजे 'डर'. मला शाहरुखची भूमिका दिल्यास मी हा सिनेमा स्वीकारेन असे श्रीदेवीने यश चोप्रा यांना सांगितले होते. मात्र त्यांनी तिला नकार दिला. नंतर एका मुलाखतीत आपला निर्णय योग्य असल्याचे यश चोप्रांनी सांगितले होते. मात्र या सिनेमातील 'टूट गयी..' या गाण्यात जुहीला श्रीदेवीच्या लोकप्रिय चांदनी सिनेमातील लूकसारखा लूक देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली होती.
-
आईना (१९९३)- यश राजची आणखी एक ऑफर आणि श्रीदेवीचा आणखी एक नकार. श्रीदेवीची आणखी एक भूमिका जुही चावलाच्या झोळीत पडली. मला 'यश राज बॅनर'साठी काम करायचे नाही म्हणून मी हा सिनेमा नाकारला असे श्रीदेवीने त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते.
-
बाजीगर (१९९३)- निर्माते अब्बास मस्तान यांनी 'बाजीगर'साठी श्रीदेवीला विचारणा केली होती. या सिनेमात श्रीदेवीने जुळ्या बहिणींची भूमिका साकारणे अपेक्षित होते. मात्र सिनेमामध्ये शाहरूखने श्रीदेवी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचा खून केला तर प्रेक्षकांना शाहरुखच्या व्यक्तिरेखेबद्दल सहानभुती वाटली नसती असे मत दिग्दर्शकांनी नोंदवले. म्हणून काजोल आणि शिल्पा शेट्टीला या सिनेमात भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली. हा सिनेमा श्रीदेवी यांनी थेट नाकारला नसला तरी त्यांच्याशी चर्चा करूनच यात काजोल आणि शिल्पाला भूमिका देण्यात आल्या. बॉक्स ऑफीसवर 'बाजीगर' तुफान गाजला आणि शाहरुखला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
-
मोहरा (१९९४)- यामध्ये अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी श्रीदेवी यांना विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी भूमिका नाकारली. नंतर या भूमिकेसाठी दिव्या भारतीची निवड झाली. मात्र चित्रिकरण सुरु असतानाच्या काळात दिव्या भारतीचा मृत्यू झाल्याने रविना टंडनची या सिनेमात वर्णी लागली.
-
दिल तो पागल है (१९९७)- एकाच प्रकारचे कथानक पुन्हा पुन्हा करणे योग्य नाही असे सांगत श्रीदेवीने हा सिनेमा नाकारला. त्यामुळे मुख्य भूमिका माधुरी दीक्षितला देण्यात आली. या भूमिकेसाठी माधुरीला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शाहरुख, माधुरी आणि करिष्मा कपूरचा हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. शाहरुखसोबतचा हा चौथा सिनेमा होता जो श्रीदेवी यांनी नाकारला होता.
-
युगपुरुष (१९९८)- मी माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम करणार आहे असे नाना पाटेकर यांनी सगळीकडे सांगून ठेवले होते. या सिनेमासाठी ते खूपच उत्सुक होते. मात्र आधी सिनेमा स्वीकारल्यानंतर श्रीदेवी यांनी नंतर नकार दिला. बोनी कपूरमुळे तिने ही भूमिका नाकारली अशी त्यावेळी चर्चा होती.
-
मोहोब्बते (२०००)- या सिनेमामध्ये श्रीदेवीला एक खास भूमिका देण्यात आली होती. मात्र तिने ती भूमिका साकारण्यास नकार दिला. त्यामुळे सिनेमाची संपूर्ण गोष्टच बदलण्यात आली आणि श्रीदेवीच्या जागी कोणालाच ही व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळाली नाही. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्याच्या या सिनेमाने चांगली कमाई केली होती.
-
शक्ती: द पॉवर (२००२)- श्रीदेवी स्वत: या सिनेमाची निर्माती होती. हा सिनेमा श्रीदेवीचा बॉलिवूडमधील कमबॅक सिनेमा म्हणून पाहिला जात होता. मात्र त्याच काळात श्रीदेवी दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने तिला मुख्य भूमिकेसाठी नवीन अभिनेत्री शोधावी लागली. आधी काजोलला देण्यात आलेली ही भूमिका तिने नकार दिल्याने नंतर करिष्मा कपूरने साकारली. यामध्ये शाहरुख खान आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकांमध्ये होते.
-
बागबान (२००३)- बागबान सिनेमात हेमा मालिनी यांनी साकारलेली अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारण्याची ऑफर श्रीदेवीने नाकारली. त्यावेळी सिनेमांमध्ये परत काम करायचे नाही असे श्रीदेवीने ठरवले होते. तसेच या भूमिकेच्या माध्यमातून पुनरागमन करणे योग्य नसल्याचे तिचे मत होते म्हणून तिने हा सिनेमा नाकारला.

Mothers Day 2025: “घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही…” आईला मातृदिनाच्या द्या हटके शुभेच्छा; एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् फ्री डाउनलोड करा HD फोटो