गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यात ‘सविता भाभी’ची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या टीमने हटके पद्धत वापरत चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. आता या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिका वठवत असून ती सविता भाभी ही व्यक्तीरेखा साकारत आहे. एकीकडे कायदेशीर नोटिशीचा वाद असतानाच दुसरीकडे ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. “अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरीदेखील तो उघडपणे आपण उच्चारत नाही. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. तसंच या नावामुळे लोकांची लैंगिक भूक चाळवली जाते. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे”, असा आरोप ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केला. प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे चित्रपटाच्या नावात बदल करण्याचं शक्य नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. ब्राह्मण महासंघाच्या मते, अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न चित्रपट आहे. -
चित्रपटाचं नाव जरी नाही बदललं तरी आमचा विरोध कायम राहणार असा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, नाव बदलण्यामागचं कारण आम्ही लोकांना सांगू. तसंच अशा प्रकारचे चित्रपट पाहू नये असं आवाहनही करू, असं ते म्हणाले. या चित्रपटात अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त