-
जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र घडला, त्यांचा इतिहास जनमनात रुजवण्याचं काम शाहिरांनी, लोककलावंतांनी मोठ्या कौशल्याने केलं. कालांतरानं माध्यमं बदलत गेली, मात्र छत्रपतींबद्दलचा आदर आणि त्यांना नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठीचे प्रयत्न मात्र चालूच राहिले आणि या पुढेही चालू राहतील. या बदललेल्या माध्यमातून म्हणजे चित्रपटांमधून, मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर आले. चला तर मग, कोणकोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारली, त्यावर एक नजर टाकूया..
मराठी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात चंद्रकांत-सूर्यकांत या जोडीतले अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सूर्यकांत यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर लोक मुजरा करत असत, असं काही ज्येष्ठ लोक सांगतात. स्वराज्याचा शिलेदार, पावनखिंड, धन्य ते संताजी धनाजी हे त्यांचे काही चित्रपट. -
ऐतिहासिक भूमिकांचं आवाहन लीलया पेलणाऱ्या अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या अगदी मनात उतरले. चित्रपट, नाटके, मराठी- हिंदी मालिकांमध्येही त्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली आहे.
-
अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकरने फत्तेशिकस्त या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराजांनी पार पाडलेल्या गनिमी काव्याच्या एका थरारक मोहिमेवर हा चित्रपट आधारित आहे.
२००९ सालच्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली. हा चित्रपट, त्यातली गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. -
स्वराज्यरक्षक संभाजी या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या मालिकेत शंतनू मोघे याने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
-
अभिनेता शरद केळकरने 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटात छत्रपतींची भूमिका साकारली होती. वीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात तो ही भूमिका साकारत आहे. आजच त्याचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…