-
तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
-
सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होत आहे.
-
एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.
-
अभिनेता नानीने ट्विट करत म्हटलं, “मी आत्ताच जय भीम चित्रपट पाहिला. सूर्या शिवकुमार सर यांच्या बद्दलचा आदर खूप वाढला. याशिवाय सेनगानी आणि राजाकन्नू या पात्रांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्यांचं कौतुक. हा अप्रतिम चित्रपट दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार.”
-
प्रेक्षक सुद्धा या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त करत आहे. मात्र या चित्रपटात अभिनेता सूर्याने साकारलेली व्यक्तिरेखा ‘जस्टिस चंद्रू’ कोण आहेत?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
ज्यांच्यावर संपूर्ण चित्रपट बनवण्यात आला ते जस्टिस चंद्रू कोण आहेत, हे आपण जाणून घेऊया
-
‘जय भीम’ हा चित्रपट १९९३ मध्ये तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. एका आदीवासी कुटुंबावर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे हे प्रकरण आहे.
-
या घटनेनंतर १३ वर्षांनी त्या पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर एका डॉक्टरला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
-
जस्टिस चंद्रू या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी केरळमधील काही साक्षीदारांचा शोध घेतला.
-
साक्षीदारांनी पोलीस खोटे बोलत असल्याची साक्ष न्यायालयात दिली. चंद्रू यांनी केवळ वकिलाचेच काम केले नाही, तर तपास यंत्रणेचे कामही केले.
-
यानंतर जस्टिस चंद्रू यांना न्यायाधीश करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले आहेत.
-
खरे तर जस्टिस चंद्रू यांना वकिली करण्यात रस नव्हता. ते अपघाताने या व्यवसायात आले.
-
महाविद्यालयीन काळात ते डाव्या चळवळीशी जोडले गेले होते.
-
त्या काळात ते संपूर्ण तामिळनाडूमध्ये फिरले आणि वेगवेगळ्या लोकांसोबत राहिले. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरवले.
-
जस्टिस चंद्रू म्हणतात, “मी कॉलेजमध्ये असताना देशात आणीबाणी होती. आणि त्यानंतर मी पाहिले की अनेकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळेच मी पूर्णवेळ वकील होण्याचा निर्णय घेतला.”
-
‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रू यांनी सांगितले की, “गरीब आणि दलितांसाठी कायदेशीर लढाई लढणे खूप कठीण आहे. बरेच लोक विचारतात की तुमचे हे गरीब लोक किती काळ या किचकट कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जातील?, मी त्यांना एवढंच सांगू शकतो जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत.
-
२००६ मध्ये न्यायमूर्ती चंद्रू यांना मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनवण्यात आले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना कायम न्यायाधीश बनवण्यात आले.
-
न्यायाधीश म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ९६ हजार खटल्यांची सुनावणी केली. हा एक विक्रम आहे.
-
साधारणपणे, एक न्यायाधीश त्याच्या कारकिर्दीत सरासरी फक्त १० किंवा २० हजार खटल्यांची सुनावणी करू शकतो, बीबीसीने ही माहिती दिली आहे.
-
जस्टिस यांच्या एका निर्णयामुळे २५ हजार महिलांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळाला होता. तसेच त्यांनी त्यांच्या गाडीवरील लाल दिवा काढला होता. आणि त्याच्या सुरक्षेसाठी गार्ड ठेवण्यासही नकार दिला होता.
-
सुणावनी दरम्यान ते एक पाऊल पुढे जाऊन लोकांना ‘माय लॉर्ड’ म्हणू नये असा आग्रह करत होते.
Pune Rape Case Dattatraya Gade : आर्थिक स्थिती बेताची, आई-वडील शेतमजूर तर पत्नी आहे खेळाडू; दत्तात्रय गाडेची कुंडली पाहा!