-
छोट्या पडद्यावरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या तिन्ही भागांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
-
‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका प्रसिद्धीझोतात असताना मात्र ‘शेवंता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांसह चाहत्यांना धक्का बसला आहे.
-
अपूर्वाने हा निर्णय नेमका का घेतला? याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे. इन्स्टाग्रामवर सलग तीन पोस्ट करत तिने ही मालिका सोडत असल्याचे जाहीर केले आहे.
-
“शेवंता, बस नाम ही काफी है, पर कभी कभी ये इतनाही काफी नही होता. शेवंता म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले,” असे तिने यावेळी सांगितले.
-
“खरं सांगायचं तर शेवंताचे सादरीकरण हे मला सहज जमत गेले. जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैल, निर-निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली,” असेही अपूर्वा म्हणाली.
-
“असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी शेवंताच्या भूमिकेचा त्याग का केला? असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याच उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे,” असे ती या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे म्हणाली.
-
“शेवंता या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही नेगिटिव्ह कमेंट्स आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले,” असा आरोप अपूर्वाने केला आहे.
-
“तसेच उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या,” असेही तिने सांगितले.
-
“त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही,” असेही ती म्हणाली.
-
“प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे ५ ते ६ दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले,” असेही तिने सांगितले.
-
“परंतु ५ ते ६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे,” असेही अपूर्वा म्हणाली.
-
“असाच प्रकार गेल्यावर्षी झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही,असं आश्वासन दिले गेले होतं. अद्याप पर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासनसुद्धा पाळलं गेलं नाही,” असाही आरोप तिने केला आहे.
-
“मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला,” असे ती म्हणाली.
-
“या पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे,” असेही अपूर्वा म्हणाली.
-
“आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहिन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.” असेही अपूर्वा नेमळेकर हिने सांगितले.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश