-
सध्या देशभरामध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’वरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट खरोखरच फार उत्तम असून मागील ३२ वर्षांपासून खदखदत असणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या वेदना उत्तमपणे मोठ्या पडद्यावर साकारल्याचं कौतुक केलं जातंय.
-
तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, निवडक मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका केली जातेय. याचमुळे अनेक बड्या कलाकारांनी या चित्रपटाबद्दल भाष्य करणं सोयीस्करपणे टाळलं आहे.
-
या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन देशातील राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून या चित्रपटावरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे हा चित्रपट अधिक चर्चेत आहे.
-
असं असतानाच रितेश देशमुखने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात एक ट्विट केलं. रितेशने चित्रपटाचं कौतुक करणारं ट्विट केलं त्याला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी रिप्लायही दिला. पण यावरुन रितेशला सध्या ट्रोल केलं जात आहे. तो नक्की काय म्हणालाय आणि त्याला का ट्रोल केलं जातंय जाणून घेऊयात.
-
१९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर जम्मू-काश्मीरमध्ये झालेले हल्ले आणि हत्याकांडाच्या कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलंय. त्यामध्ये ‘पुष्पा’, ‘सुर्यवंशी’ यासारख्या मोठ्या चित्रपटांचाही समावेश आहे.
-
एका संवेदनशील विषयावर आधारित या चित्रपटाने पाहिल्या पाच दिवसांमध्ये ४० कोटींच्या कामाईचा टप्पा ओलांडला असून चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये असेल असा अंदाज काही समिक्षकांनी व्यक्त केलाय.
-
११ तारखेला प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याचाच संदर्भ देत रितेशने एक ट्विट केलं.
-
“अनेक विक्रम मोडीत काढलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हिच योग्य वेळ आहे. एक लहान (कमी बजेटमध्ये बनवलेला) चित्रपट आता सर्वकालीन सर्वात यशस्वी चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! तुमच्या टीमला माझं फार सारं प्रेम आणि तुमचं फार फार कौतुकही वाटतंय,” असं रितेशने ट्विटमध्ये म्हटलंय.
-
यावर विवेक अग्निहोत्री यांनी हात जोडणारे इमोंजी आणि सोबत, “धन्यवाद रितेश” असा रिप्लाय दिलाय. मात्र विवेक अग्निहोत्रींच्या रिप्लायवर अनेकांनी रितेशला लक्ष्य केलंय.
-
एकाने, “सर, व्यवसायिक दृष्ट्या हा चित्रपट यशस्वी झाला म्हणून त्याने ट्विट केलंय. त्याने प्रेक्षकांची ताकद पाहिलीय. त्याने चित्रपटाच्या कारणाबद्दल उल्लेखही केला नाहीय. चित्रपट तर एक माध्यम होता, मुख्य गोष्ट तर मुद्दा आहे. त्यावर त्याने भाष्य केलं नाहीय. तो फार स्वार्थी आहे,” अशा शब्दांमध्ये रितेशला सुनावलंय.
-
एकाने रितेशच्या या ट्विटवर के. के. मेनन यांनी चित्रपटाचं ज्यापद्धतीने कौतुक केलंय त्याचा संदर्भ देत, “कौतुक कसं करावं हे शिकून घे,” असा टोला लगावलाय.
-
स्वयंघोषित चित्रपट समिक्षक असणाऱ्या केआरकेनेही रितेशच्या या ट्विटवर रिप्लाय देत, “तू पुन्हा चुकलास, हा चित्रपट नाहीय, ही एक मोहीम आहे,” असं म्हटलंय.
-
दुसऱ्या एका चहात्याने “हे चुकीची गोष्ट आहे की तुम्ही याला छोटा चित्रपट म्हणत आहात. हा चित्रपट आहे का? हे तर ते सत्य आहे जे आजपर्यंत आपल्यापासून लपवण्यात आलं. याला काश्मिरी पंडितांचं आत्मचरित्र म्हणा आणि त्याला प्रमोट करा,” असं म्हटलंय.
-
एका महिलेने रितेशला सुनावताना, “कंटेटबद्दल कोण बोलणार? यश केवळ व्यवसायिक कमाईमध्ये असतं का?, फार सुरक्षित भूमिका घेतलीय,” असं म्हटलंय.
-
यावर एकाने रिप्लाय देताना, “सगळेजण अक्षय कुमारप्रमाणे सुरक्षित ट्विट करत आहेत. आपल्या भविष्यातील चित्रपटांना फटका बसू नये म्हणून ते काळजी घेताना दिसताय. पण रितेश हा फार पारदर्शक आणि चांगला व्यक्ती आहे त्याने असं म्हणणं थोडं खेदजनक वाटतंय,” असं म्हटलंय.
-
एकाने, “मला वाटलेलं तू फार धर्मनिरपेक्ष आहेस. मात्र या ट्विटमुळे तो समज दूर झाला,” असं ट्विट केलंय.
-
हे लोक प्रपोगांडासाठी काम करतात त्याच्यासाठी ट्विट करु नका सर, याचा तुम्हाला फटका बसेल असा सल्ला एका चाहत्याने रितेशला दिलाय.
-
अन्य एकाने, “तू चित्रपट पाहिलास की नाही? चित्रपटाचं कौतुक करतोय ते… काश्मिरी पंडितांसोबत जे झालं त्याबद्दल बोल, गोल गोल फिरु नकोस,” असा टोला लगावलाय.
-
त्यावर अन्य एकाने रिप्लाय देत “तो चित्रपटाच्या कंटेटबद्दल बोलत नाहीय. तो केवळ कमाईबद्दल बोलतोय. तो राजकारण्याचा मुलगा आहे,” असं म्हटलंय.
-
एकाने रितेशला ‘झुंड’ चित्रपटाबद्दल त्यानेच केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली. “तू ‘झुंड’बद्दल जे बोलला तेच इथे द कश्मीर फाइल्ससाठीही लागू होतं,” असं या व्यक्तीने म्हटलंय.
-
एकंदरितच रितेशच्या या ट्विटवरुन त्याला चित्रपटाचे समर्थक थेट विषयाचा उल्लेख न केल्याबद्दल तर विरोधक केवळ ट्विट केल्याबद्दल टीका करताना दिसत आहेत. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”