-
मागील काही काळापासून उत्तर भारतामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांना चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
-
अगदी ‘बाहुबली’पासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ-२’ पर्यंत हेच दिसून आलं आहे.
-
मात्र या यशामुळे बॉलिवूडच्या कलाकारांची झोप उडालीय हे ही खरं आहे. प्रभास असो किंवा यश दाक्षिणात्य सुपरस्टार आज भारताच्या घराघरात पोहोचले आहेत.
-
केवळ दाक्षिणात्य कलाकारच नाही तर बाहुलबलीच्या माध्यमातून शरद केळकर आणि पुष्पाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे सुद्धा त्यांच्या आवाजामुळे देभरात ओळखले जाऊ लागले.
-
बाहुबलीमुळे प्रभासला जे यश मिळालं तेच यश हिंदी डबिंगमुळे शरद केळकरला मिळालं.
-
त्याचप्रमाणे ‘पुष्पा’च्या हिंदी डबिंगला जसा प्रतिसाद मिळाला त्यामुळे श्रेयस तळपदेचा आवाज अगदी उत्तर भारतीय चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन गेला.
-
पुष्पामध्ये अल्लू अर्जूनच्या भूमिका आवाज देणार श्रेयस मराठी आहे.
-
त्याचप्रमाणे प्रभासचा आवाज झालेला शरद केळकरही मराठीच.
-
शरद केळकर आणि श्रेयसपाठोपाठ आता ‘केजीएफ-२’च्या माध्यमातून आणखीन एक मराठी आवाज लोकप्रिय झालाय तो सुद्धा मूळचा मराठीच आहे.
-
आता केजीएफ-२ च्या माध्यमातून या डबिंग आर्टिस्टच्या यादीमध्ये आणखीन एक मराठमोळ्या नावाचा समावेश झालाय. ते नाव म्हणजे सचिन गोळे.
-
कन्नड सुपरस्टार असणाऱ्या यशचा बहुचर्चित ‘केजीएफ-२’ बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम मोडत असतानाच या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पाच दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई केलीय.
-
या चित्रपटामुळे यश हा राष्ट्रीय स्तरावरील स्टार झालाय.
-
त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या माध्यमातून डबिंग आर्टिस्ट सचिन गोळेचीही सध्या मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा दिसून येतेय.
-
याशिवाय त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचं डबिंग केलं असून मागील १४ वर्षांपासून तो या क्षेत्रात काम करतोय.
-
‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिनने आपला प्रवास उलगडून सांगितला होता.
-
२००८ मध्ये मी पनवेलमध्ये रहायचो. अभिनेता होण्याच्या इच्छेने मी मुंबईमध्ये आलो. माझ्या आई-वडिलांनी यासाठी मला साथ दिली, असं सचिन सांगतो.
-
मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा मला वडिलांनी, ‘तुझं हेच स्वप्न असेल तर तू हे काम नक्की कर’ असं सांगितल्याचं सचिन म्हणतो.
-
मुंबईत आल्यानंतर फार स्ट्रगल करावं लागल्याचं सचिन सांगतो. अनेकदा ऑडिशन देऊनही मला संधी मिळाली नाही. अनेकदा मी उपाशी झोपलोय असंही तो आपल्या या संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना म्हणाला.
-
अभिनयाच्या क्षेत्रात मला संधी मिळत नसल्याने माझा मित्र असणाऱ्या अनिल म्हात्रेने मला डबिंगमध्ये संधी दिली, असं सचिन सांगतो.
-
अनिल म्हात्रेनेच माझी ओळख गणेश दिवेकर या प्रसिद्ध डबिंग आर्टीस्टसोबत करुन दिली. त्यानंतर डबिंगच्या क्षेत्रातील महेंद्र भटनागर आणि सुमंत जामदारसारख्या मोठ्या व्यक्तींसोबत मला डबिंगमधील बारकावे शिकता आले, असं सचिन म्हणतो.
-
डबिंग शिकता शिकता पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी बँकांमध्ये होम लोन विभागामध्ये नोकरीही केली. बँकेतील काम संपल्यावर मी डबिंगसाठी स्टुडिओमध्ये जायचो. तर कधीतरी कामावर फक्त हजेरी लावून लपून छपून डबिंगसाठी जायचो, असंही सचिन सांगतो.
-
एकदा सचिनच्या बॉसने त्याला लपून छपून डबिंगला जात असताना रंगेहाथ पकडलं. मात्र सचिनला ओरडण्याऐवजी त्याने त्याला समजावलं.
-
ज्याची आवड आहे ते मनापासून कर. दोन दगडांवर एकाच वेळी पाय ठेवायला गेल्यास नुकसान तुझचं आहे असं बॉसने सचिनला समजावून सांगितलं.
-
त्यानंतर सचिनने काहीही झालं तरी पुढील सहा सात महिन्यामध्ये डबिंग शिकण्याचा निश्चय केला. आठ महिन्यांनंतरही यश मिळालं नाही तर पनवेलला परत जाईन आणि आई-बाबांसोबत राहून एखादी नोकरी करेन, असं सचिनने मनाशी पक्कं केलं.
-
त्यापुढे सचिनने पूर्ण वेळ डबिंगला दिला. एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओमध्ये तो फेऱ्या मारु लागला. काहीजण म्हणायचे की तुझ्या बोलण्यात मराठी डोकावते, असं म्हणून हिणवण्यात आलं. तर काही म्हणायचे तुझी जीभ जड आहे, काही म्हणायचे तू फार हळू बोलतो, तुझा आवाज कलाकारांशी लिप्सिंग नाही करु शकत असंही काहींनी सांगितल्याचं सचिन म्हणतो.
-
मात्र काहींनी मला खरोखरच माझे उच्चार आणि बोलण्याची शैली सुधारण्यास मदत केली, असं सचिन आनंदाने सांगतो.
-
अनेक स्टुडिओंमध्ये कामांसाठी चकरा मारल्यानंतर हळूहळू सचिनला छोटी-मोठी कामं मिळू लागली. याच कालावधीत त्याची ओळख डबिंग क्षेत्रातील काही मोठ्या व्यक्तींशी झाली. यामध्ये अंजू पिंकी तसेच डबिंग कॉर्डिनेटर अल्पना यासारख्या लोकांचा समावेश होता. याच लोकांच्या मदतीने पुढे सचिनला दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये डबिंगची संधी मिळाली.
-
दहा वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांचं डबिंग हे अगदी स्वस्तात केलं जायचं. त्यामुळे अनेक स्टुडिओंनी मला डबिंगचं काम देण्यास सुरुवात केली.
-
मी चांगलं डबिंग शिकलो होतो आणि पैसे सुद्धा कमी घ्यायचो त्यामुळे अधिक कामं मिळू लागली आणि मी डबिंग क्षेत्रात रुळलो, असं सचिन म्हणतो.
-
धनुषच्या ‘ताकद मेरा फैसला’ या चित्रपटाच्या डबिंगमधून सचिनला पहिला मोठा ब्रेक मिळाला. मोठ्या प्रोडक्शन हाऊससाठी हा सचिनचा पहिला चित्रपट होता.
-
त्यानंतर हळूहळू धनुषची जेवढे दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब झाले त्यामध्ये सचिनलाच संधी देण्यात आली.
-
धनुषच्या मारी चित्रपटाचं हिंदी नाव राउडी हिरो असं होतं. या चित्रपटाने सचिनचं आयुष्य बदलून टाकलं.
-
मारीमध्ये धनुषने साकारलेल्या गुंडाच्या कॅरेक्टरसाठी मी मुंबईकर गुंडाची स्टाइल वापरली आणि ते प्रेक्षकांना एवढी आवडली की त्यांनी मला कॉल करुन माझं अभिनंदन केलं, असं सचिन सांगतो.
-
धनुषच्या अनेक चित्रपटांना हिंदीमध्ये सचिनचाच आवाज असतो.
-
यानंतर ओटीटीचा काळ आला. मी अनेक वेब सीरीज आणि कार्टून कॅरेक्टर्सला माझा आवाज दिलाय, असं सचिन सांगतो.
-
सचिन ‘केजीएफ’ला त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइण्ट मानतो कारण हा फार मोठा चित्रपट होता.
-
केजीएफच्या आधी सचिनने अनेकदा यशच्या चित्रपटांसाठी हिंदी डबिंग केलं आहे मात्र यशला याची कल्पना नव्हती.
-
यशला युट्यूब आणि हिंदी डब सिनेमांचे अनेक आवाज ऐकवण्यात आले मात्र त्याला सचिनचा आवाज आवडला.
-
केजीएफच्या ऑडिशनला मी, ‘ट्रिगर पे हाथ रखने वाला शूटर नहीं होता, लड़की पे हाथ डालने वाला मर्द नहीं होता और अपुन की औकात अपुन के चाहने वालों से ज्यादा और कोई समझ नहीं सकता’ हा डायलॉग बोललो आणि यशने माझं सिलेक्शन केलं, असं सचिनने सांगितलं.
-
केजीएफचं सारं श्रेय सचिन यशला देतो.
-
केजीएफ चित्रपटासाठी यशने चार ते पाच वर्ष मेहनत केलीय. त्याने माझ्यावरही मेहनत घेतलीय असं सचिन सांगतो.
-
सचिनचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आज सचिन हिंदीमधील डब सिनेमामध्ये अनेक कलाकारांचा आवाज म्हणून ओळखला जातो.
-
चेहरा अभिनेत्यांचा असला तरी त्यामागील आवाज हा मराठमोळ्या पनवेलकर असणाऱ्या सचिनचा आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
-
केजीएफच्या यशामध्ये सचिनचा मोठा वाटा आहे यात शंकाच नाही.
-
या श्रेत्रातील पुढील वाटचालीसाठी सचिनला खूप साऱ्या शुभेच्छा. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)
