-
सध्या सिनेसृष्टीत अनेक गोष्टींचे ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाले. चांगले, वाईट या दोन्हीही प्रकारचे ट्रेंड यात होते.
-
अशातच सध्या इन्स्टाग्रामवर एक हॅशटॅग चर्चेचा विषय ठरला आहे. #घरापासून_दूर असे या हॅशटॅग चॅलेंजचे नाव आहे.
-
यात अनेक मराठी कलाकार घरापासून दूर राहिल्यानंतर त्यांचे अनुभव सांगताना दिसत आहेत. यातील अनेक कलाकार हे शिक्षण, अभिनय किंवा इतर कारणांसाठी घर सोडून राहिले आहेत.
-
घरापासून लांब गेल्यानंतर येणारा अनुभव प्रत्येकासाठी काही ना काहीतरी शिकवून जाणारा असतो. तो प्रवास किंवा अनुभव अनेक कलाकार सांगताना दिसत आहेत.
-
या चॅलेंजची सुरुवात अभिनेता हेमंत ढोमे याने केली. त्याने त्याचा एक फोटो शेअर करत घरापासून दूर राहिल्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
-
“मी माझं M.Sc (Masters in wildlife conservation) पुर्ण करायला दोन वर्ष केंट युनीवर्सीटी, इंग्लंड मधे होतो. त्या दोन वर्षांनी माझं सग्गळं आयुष्य बदलुन गेलं… घरापासून दूर गेल्यावर आपण स्वतःच्या अजुन जवळ जातो एवढं नक्की…#घरापासून_दूर”, असे हेमंत ढोमे याने म्हटले आहे.
-
त्यानंतर त्याने सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, तेजस्वी पंडित आणि सुयोग गोऱ्हे यांना टॅग करत तुम्हाला काय वाटतं? याबद्दल प्रतिक्रिया देण्यास सांगितले आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
-
“१२ वर्ष झाली मला माझ्या पुण्यातल्या घरापासून लांब जाऊन. आणि आत्ता कुठे मला माझं घर मिळालंय. अशी एक जागा जिथे आपण आपल्या तोंडावरचे सगळे चेहरे काढून बाजुला ठेवू शकतो ते आपलं घर असतं. कितीही बाहेर गेलो, लांब गेलो तरी ते आपल्याला क्षणोक्षणी दिसत राहतं. खुणावत राहतं.”
-
“आजूबाजूच्या बहिरं करुन सोडणाऱ्या गर्दीतही आपल्याला आपल्या घराची हाक ऐकू येते, आणि आपण चटकन मागे वळून बघतो. ते मागे वळून पाहणं मला कायम हवंय. घरी परत जाण्याची भावना कायम हवीय. तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न सिद्धार्थने इतर कलाकरांना विचारला आहे.
-
यानंतर अभिनेत्री सायली संजीवने तिच्या आठवणी सांगितल्याआहेत. “Shoot च्या निमित्ताने अनेकदा घरापासून दूर रहाव लागतं.. तेव्हा खूप आठवण येते घराची..घर म्हणजे सुकून आहे.. प्रेम आहे. तुमच्यासाठी घर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न सायलीने विचारला आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता ललित प्रभाकरने नुकतंच या हॅशटॅगचा वापर करत जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
-
“मी ६ वी आणि ७ वी साठी दोन वर्ष जवाहर नवोदय विद्यालय ला बोर्डिंगमधे होतो. माझं नाटकातलं पहिलं काम मी ह्या शाळेत केलं.घरापासून दूर गेल्यावर आपल्याला आपल्यातलंच काहीतरी नविन नक्की सापडतं… #घरापासून_दूर”, असे त्याने म्हटले आहे. त्यासोबत त्याने एक खास फोटोही शेअर केला आहे.
-
तर अभिनेत्री रसिका सुनीलने तिची एक आठवण सांगितली आहे. त्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. “मी पण लॉस एंजेल्सच्या New York Film Academy मध्ये अभिनय संदर्भातील कोर्स करायला गेले होते आणि अनेक वेगवेगळ्या देशामधले क्लासमेट्स मित्र तर झालेच. पण त्यांचं काम बघून पण खूप शिकता आलं. घरापासून दूर गेल्यावर आपण घराच्या अजुन जवळ जातो! आणि स्वत:च्याही जवळ येतो. स्वत:वर प्रेम करणं आणि आत्मविश्वास मला या अनुभवातून जास्त छान गवसले. #घरापासून_दूर”, असे रसिका सुनीलने म्हटले.
-
आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अभिषेक देशमुख यानेही या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे. त्यासोबत त्याने त्याला जळगावच्या घराची आठवण येत असल्याचेही सांगितले आहे.
-
“#घरापासून_दूर ..2004 साली 10 वी नंतर मी घराबाहेर पडलो…पुण्यात आलो..माझे जळगाव चे मित्र माझ्याबरोबर होते..2007 पासून पुढची 5 वर्ष आर्कीटेक्चर साठी मुंबईत होस्टेल ला राहीलो..पण #घरापासून_दूर मी एकटाच नव्हतो माझे अनेक मित्र वेगवेगळ्या गावातून,शहरातून,राज्यातून आले होते..रात्रभर जागून केलेले सबमिशन्स..भाऊचा धक्का..डॅाकयार्ड..गोराईचा पॅगोडा..सोबो..बॅंडस्टॅंड..काला घोडा फेस्ट..अशा अनेक साईट विजीट्स होत्या..शहर पालथं घातलं..हे शहरच घर झालं..”
-
“मी घरापासून दूर असताना काही मित्रांनी त्यांच्या घरात सामावून घेतलं..वांन्द्रे-कलानगर चा सपाट वेस्टर्न हायवे बघून जळगावच्या घराची आठवण यायची आणि पोटात खड्डा पडायचा.. #घरापासून_दूर राहील्यावर घराची किंमत कळतेच पण माणसं-शिक्षक-मित्र मनात कायमस्वरुपी घर करून राहतात हे लक्षात आलं..,” असे अभिषेक देशमुख म्हणाला.
-
अभिनेत्री क्षिती जोग हिनेही याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. “मी माझ्या शालेय शिक्षणाच्या काळात आई-बाबांपासून दूर पुण्याला माझ्या आजी-आजोबांकडे राहत होते… घरापासून दूर राहून मी स्वतःच्या जवळ गेलेच पण आपली माणसं टिकवायला शिकले, नाती काय असतात हे शिकले, समजले! #घरापासून_दूर तुम्हाला काय वाटतं?”, असे तिने यावेळी म्हटले.
-
नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यानेही या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. “स्वतःची किंमत आणि जगाची गंमत कळायला घरातून बाहेर पडायला लागतं. हे बाहेर असणं तुम्हाला आतून तोडत तोडत मजबूत करतं. मन स्वच्छ आणि मोकळं करतं. एकट्याने रडायला आणि लढायला पण शिकवतं. गेल्या अकरा वर्षात घरापासून दूर राहून, एवढं नक्की शिकलो की आपण जिथे जाऊ तिथे घर केलं की नाती आपोआप तयार होतात. तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न त्याने सिनेसृष्टीतील इतर कलाकारांना विचारला आहे.
-
दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार यावर व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांनी यावर भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत
-
फक्त कलाकार नव्हे तर त्यांचे चाहतेही यावर व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का