-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली. ती सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने तिचा सह-कलाकार बॉयफ्रेंड शिझान खानविरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिझान खानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
याआधीही अनेक प्रसिद्ध कलाकारांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आयुष्य संपवले आहे. या कलाकारांच्या निधनाने मनोरंजन विश्वासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी आणि त्यांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वांनाचा धक्का बसला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली होती. मृत्यूपूर्वी वैशाली काही काळापासून खूप तणावाखाली होती. याबाबतचा उल्लेख तिने या सुसाइड नोटमध्ये केला आहे. या नोटमध्ये वैशालीने तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचंही म्हटलं आहे. त्याच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती.
-
बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार कुशल पंजाबीने मुंबईमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याने एक पत्र लिहिलं होतं. यात त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. मृत्यूपूर्वी काही महिन्यांपासून कुशलला काम मिळत नसल्यामुळे तो नैराश्यात गेला होता असं त्याच्या मित्रांचं म्हणणं होतं.
-
स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिल तो हॅप्पी है’या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल मीरा रोड येथे तिच्या दोन रूम मेटसोबत राहत होती. सेजलच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट देखील सापडली. त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरविले जाऊ नये असे तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले होते.
-
‘अदत से मजबूर’ फेम टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.
-
छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी काही दिवसांपासून काम बंद असल्यामुळे प्रेक्षा नैराश्यामध्ये गेल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर निराशाजनक पोस्ट लिहिली होती.
-
टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
-
१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या धक्कादायक मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहता वर्ग हादरला. सुशांतने त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं, पण नंतर कित्येक महिने ही आत्महत्या नसून हा खून आहे हे सिद्ध करण्याचे बरेच प्रयत्न झाले. या रहस्यमय मृत्यूमुळे बॉलिवूडकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा बदलला.
-
प्रत्युषा बॅनर्जीनं २०१६ साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्यानं तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होतं. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु तिचा कथित प्रियकर राहुल राज सिंह यानं लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं होतं असा कयास पोलिसांनी लावला होता.
-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘नि:शब्द’ या चित्रपटात झळकलेल्या जिया खानने २०१३ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या या आत्महत्येनंतर बरेच प्रश्न निर्माण झाले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”