-
करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अनेकांचे रोजगार गेले. लाखों लोकांनी आपआपल्या घरी परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले.
-
लॉकडाउनच्या काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
-
‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
ट्रेलरला लोकांची पसंती मिळाली, तर काही लोकांनी हा चित्रपट भारत विरोधी आहे असं स्पष्ट मत मांडलं. चित्रपटातून भारतीय सरकारी यंत्रणेचं योग्य चित्रण केलं नसल्याचा लोकांनी आरोप केला.
-
चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांनीही यावर भाष्य केलं, ते म्हणाले, “आपण खूप उतावीळ आहोत आणि एखाद्याबद्दल लगेच ग्रह निर्माण करतो. तुम्ही तुमचं मत अवश्य मांडा पण आधी चित्रपट बघा. एक छोटा टीझर पाहून तुम्ही या चित्रपटाला राजकीय चित्रपट असं लेबल चिकटवू शकत नाही.”
-
या चित्रपटाला होणारा विरोध पाहता युट्यूबवरुन त्याचा ट्रेलरही काही तासांत हटवण्यात आला. सुरुवातीला कोणाच्या लक्षात आलं नाही, पण आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. सोशल मिडियावर या चित्रपटाचा ट्रेलर हटवण्यावरुन चांगलाच विरोध होताना दिसत आहे.
-
ट्विटरवर तर एकाप्रकारे ट्रेलर हटवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांचं आहे असे आरोप लावले जात आहेत. त्यांच्याविरोधात ट्वीट करून कलाकारांचा आवाज दाबण्यात येत असल्याचं म्हंटलं जात आहे.
-
“पंतप्रधान मोदी घाबरले” अशा आशयाची वेगवेगळी ट्वीट शेअर करत बरीच लोक याचा विरोध करताना दिसत आहेत.
-
हा विरोध पाहता एक दिवसापूर्वी ‘भीड’चा ट्रेलर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे, पण यावेळी मात्र ट्रेलरमध्ये छोटा बदल करण्यात आला आहे.
-
पहिल्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाउनच्या घोषणेचा वापर करण्यात आल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. आता नव्या ट्रेलरमध्ये या ऐवजी एका वेगळ्याच व्हॉईस आर्टिस्टचा आवाज वापरण्यात आला आहे.
-
नेमका हा बदल का करण्यात आला आहे, आणि मध्यंतरी हा ट्रेलर युट्यूबवरुन का हटवण्यात आला होता? याबद्दल चित्रपटाचे निर्माते किंवा इतर कुणीही भाष्य केलेलं नाही.
-
एकंदर ट्रेलरमध्ये केलेले बदल पाहता या चित्रपटालाही राजकीय विरोधकांचा सामना करावा लागला आहे आणि यापुढेही सामना करावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी