परिणीती चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने आपल्या अभिनयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘सायना’, ‘हंसी तो फंसी’, ‘तिरंगा’ अशा चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच मनोरंजन केलं. आता परिणीतीने गायिका म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केलंय. अभिनय क्षेत्रातून संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परिणीतीचा पहिला लाइव्ह परफॉर्मन्स मुंबईत झाला. रविवारी २८ जानेवारी रोजी मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये सहभाग घेत तिने आपला पहिला लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला.या कार्यक्रमाचे फोटो तिने तिच्या अधिकृच इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.“आणि हे झालं… हे टाइप करताना मला आनंदाश्रू येत आहेत, काल रात्री माझा पहिला लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्स झाला आणि माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली. तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण आहे,” असं कॅप्शन देत परिणीतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. या फोटोंसह व्हिडीओ शेअर करत परिणिती म्हणाली, “हा माझा सर्वात पहिला आणि लक्षात राहणारा शो असेल, महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा पहिला शो मी माझ्याचं शहरात मुंबईत केला याचा मला अभिमान आहे.” (फोटो स्त्रोत: @parineetichopra /instagram)