-
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झालं. १५ जुलैला पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले होते.
-
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला होता. या घटनेनंतर जवळपास ६ महिन्यांनी त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे.
-
‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी यांनी आयुष्यातील चढ-उतार, चांगल्या-वाईट आठवणी लिहित भावनांना वाट मोकळी करून दिल्याचं सांगितलं.
-
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रवींद्र व माधवी महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर देखील उपस्थित होता. यावेळी अभिनेत्याने वडिलांच्या निधनादरम्यान घरात घडलेला एक प्रसंग सर्वांना वाचून दाखवला.
-
१२ जुलै २०२३ रोजी गश्मीरला राहत्या घरातील बेडरुमच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी कुजल्यासारखा आणि विशेषत: कुजलेल्या मांसाचा वास येत होता.
-
सुरुवातीला कुठे तरी उंदीर मरून पडला असावा असा समज अभिनेत्याचा झाला. म्हणून गश्मीरने बायकोसह संपूर्ण वॉर्डरोब हुडकून काढला परंतु, त्याला कुठेही काहीच सापडलं नाही.
-
त्याच दिवशी गश्मीरच्या आईची ( माधवी महाजनी ) तब्येत ढासळली आणि त्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या.
-
गश्मीर याबद्दल सांगतो, “दुसऱ्या दिवशी, मी आईला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. तिच्या उलट्या कमी झाल्या होत्या पण, पोटातील आतड्या पार पिळवटून निघाल्या होत्या.”
-
आईला डॉक्टकडून घरी आणल्यावर अभिनेत्याने घरातील त्या कुजलेल्या वासाबद्दल त्याची पत्नी गौरीला सांगितलं.
-
तेव्हा तो वास एकट्या गश्मीरलाच येत असल्याचं समोर आलं. घरातील इतर कोणालाही तसा वास येत नव्हता.
-
गश्मीरला याचदरम्यान तळेगावातील सोसायटीमधून फोन आला आणि घर मालकाने “तुझे बाबा घराचं दार उघडत नाहीत” असं सांगितलं.
-
याबद्दल गश्मीर पुढे म्हणाला, “मला फोन आल्यावर, मी माझ्या पुण्यातील दोन मित्रांना तिकडे पाठवलं. तासाभरात मित्राने फोन करून सांगितलं, “गश्मीर लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतोय.”
-
याबाबत गश्मीर सांगतो, “मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्यांचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्या शाप देत त्यांच्या अवतीभवती घुटमळत असेल का? पण, माझ्या बाबांचा आत्मा आम्हाला नक्कीच संकेत देत होता.”
-
“आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, वॉर्डरोबमधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास या सगळ्या गोष्टी हा एक संकेत होता.” असं गश्मीरने सांगितलं.
-
“बाबा नाटकाचे प्रयोग संपल्यावर चला आता नाटकाचे तीन अंक संपले…आता चौथा सुरु असं म्हणायचे. त्यामुळेच माझ्या आईने तिच्या आयुष्यातील हा ‘चौथा अंक’ या पुस्तकाच्या स्वरुपात सर्वांसमोर मांडला आहे.” असं अभिनेत्याने सांगितलं. ( सर्व फोटो सौजन्य : गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”