-
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने २०२४ मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या काही बहुचर्चित भारतीय वेबसीरिज आणि चित्रपटांची झलक त्यांच्या ‘नेटफ्लिक्स नेक्स्ट’च्या व्हिडीओमधून मांडली आहे. २०२४ मध्ये नेमके कोणते चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊयात.
-
अमर सिंह चमकीला: भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला हे एके काळचे पंजाबी संगीतविश्वातील एक मोठे नाव होते. ८ मार्च १९८८ रोजी त्याची हत्या झाली. ते आणि त्यांची पत्नी अमरजोत कौर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ही गोष्ट तुम्हाला चित्रपटाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि ए. आर. रहमान यांचं संगीत असलेल्या या ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १२ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
-
Mismatched: यूट्यूबर प्रजक्ता कोळी हिने रोहित सराफबरोबर ‘Mismatched’ या सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. याच्या दोन्ही सीझनला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहून २०२४ मध्ये नेटफ्लिक्स या सीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहे.
-
दो पत्ती: ‘मीमी’, ‘शहजादा’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जीया’ अशा चित्रपटातून सध्याच्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली ग्लॅमरस अभिनेत्री क्रीती सेनॉन ही लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘दो पत्ती’ या चित्रपटातून क्रीती काजोलसह झळकणार आहे. हा चित्रपटही २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित होणार आहे.
-
फिर आयी हसीन दिलरुबा: ‘हसीन दिलरुबा’च्या यशानंतर अभिनेत्री तापसी पन्नू आणि ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सी हे या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ज्यात आणखी वेगळं नाट्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
-
वाइल्ड वाइल्ड पंजाब: ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘तू झुठी मै मक्कार’सारखे चित्रपट देणाऱ्या लव्ह रंजनचा आगामी ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या धमाल विनोदी चित्रपटात वरुण शर्मा, सनी सिंह, मनोजोत सिंहसारखे कलाकार झळकणार आहेत.
-
डब्बा कार्टल: जेवणाच्या डब्याच्या माध्यमातून ड्रग्सचा व्यवसाय या आगळ्या वेगळ्या आणि हटके संकल्पनेवर बेतलेली ‘डब्बा कार्टल’ही सीरिजदेखील याचवर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शबाना आजमी, ज्योतिका, शालिनी पांडे, अंजली आनंद, गजराज राव, सई ताम्हणकर, जिशू सेनगुप्तासारखे मुरलेले कलाकार या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
-
हीरामंडी: चित्रपटविश्वात दमदार काम केल्यावर आता भन्साळी हे ओटीटीवर दणक्यात एंट्री करणार आहे. असाच एक भव्यदिव्य विषय भन्साळी नेतफ्लिक्स सीरिजच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे ‘हीरामंडी’. या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा, शर्मिन सेगल, संजिदा शेखसारख्या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत. ही सीरिजही याचवर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
मामला लीगल है: भोजपुरी स्टार रवी किशन यांचा ‘मामला लीगल है’ हा कोर्टरूम कॉमेडी ड्रामा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
-
मंडाला मर्डर्स: या मिस्ट्री सस्पेन्स सीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ही सीरिजदेखील याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
द ग्रेट इंडियन कपिल शो: कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कॉमेडीयन्स नेटफ्लिक्सच्या माध्यमातून एक खास शो प्रेक्षकांसाठी याचवर्षी घेऊन येत आहेत. याची झलकही नेटफ्लिक्सने शेअर केली आहे.
-
द ग्रेटेस्ट रायवरली – इंडिया व्हर्सेज पाकिस्तान: १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली कधीही न मिटणारी दरी अन् क्रिकेट या खेळामधून साऱ्या जगाला अनुभवायला मिळणारी या दोन देशांमधील चुरशीची लढत यावर बेतलेली ही डॉक्युमेंटरी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
यो यो हनी सिंग – फेमस: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगचा प्रवास, त्याचं दारू आणि सिगारेटच्या आहारी जाणं, डिप्रेशनमधील संघर्ष आणि यावर मात करून या गायकाने पुन्हा केलेला कमबॅक हे सगळं आपल्याला नेटफ्लिक्सच्या या आगामी सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
टू किल अ टायगर: एका गंभीर विषयावर बेतलेली अन् बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चर्चिली गेलेली ही डॉक्युमेंटरी सीरिजही लवकरच नेटफ्लिक्सवर झळकणार आहे.
-
आयसी८१४ -कंदाहार हायजॅक: आजवरच्या सर्वात भयानक आणि मोठ्या विमान हायजॅकची कथा सादर करणारी ही सीरिजही याचवर्षी नेटफ्लिक्सवर येणार आहे. अनुभव सिन्हा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : नेटफ्लिक्स इंस्टाग्राम पेज)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…