-
आजवर ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे अनुपम खेर हे आज त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली.
-
अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयाबरोबच बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते त्यांचे राजकीय तसेच सामाजिक विचार मांडत असतात.
-
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजश्री प्रोडक्शनच्या ‘सारांश’ या चित्रपटातून अनुपम खेर यांना ओळख मिळाली. त्यांच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.
-
फार कमी वयात त्यांनी एका म्हाताऱ्याची भूमिका निभावलेली पाहून कित्येक लोक दंग झाले. याच चित्रपटातून मात्र त्यांना आधी काढण्यात आलं होतं. याविषयी एका मुलाखतीमध्ये अनुपम यांनी खुलासा केला होता.
-
युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनुपम खेर यांनी हजेरी लावली होती अन् याच कार्यक्रमात त्यांनी ‘सारांश’दरम्यानचा एक किस्सा सांगितला होता.
-
‘सारांश’ या चित्रपटात जरी प्रथम अनुपम खेर यांना भूमिका मिळाली असली तरी काही महिन्यांनी त्यांच्याकडून ती भूमिका काढून घेण्यात आली होती.
-
हा किस्सा या मुलाखतीमध्ये सांगताना अनुपम म्हणाले, “राजश्री प्रोडक्शनला सारांशमधील भूमिकेसाठी एक चांगला स्टार हवा म्हणून त्यांनी माझ्याऐवजी संजीव कुमार यांना घ्यायचं ठरवलं हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला प्रचंड राग आला. मी काही महीने या भूमिकेसाठी तयारी करत होतो. शेवटी मी मुंबई सोडून जायचा निर्णय घेतला आणि जाताजाता महेश भट्ट यांना भेटून खरं काय वाटतं ते सांगायचं ठरवलं. त्यामुळे मी माझं सामान बांधलं आणि थेट महेश भट्ट यांच्या पाली हिल येथील घरी गेलो.”
-
तिथे गेल्यावर सर्वप्रथम महेश भट्ट यांनी अनुपम यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. संजीव कुमारबरोबर छोटासा रोल केला तर लोक दखल घेतील असंही महेश भट्ट अनुपम खेर यांना म्हणाले.
-
यावर अनुपम खेर म्हणाले. “मी माझं सामान टॅक्सीमध्ये भरलं आहे, मी हे शहर सोडून जातोय, पण जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जगातले सर्वात जगातले मोठे फ्रॉड मनुष्य आहात. तुम्हाला माहितीये की मी ६ महीने या भूमिकेसाठी मेहनत घेतोय. राजश्रीच्या लोकांना एवढं सांगायची तुमच्यात हिंमत नाही की मी याच माणसाबरोबर काम करणार म्हणून. मी खूप चिडलो होतो आणि त्याच रागात माझ्या तोंडून निघून गेलं की, मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला शाप देतो.”
-
यानंतर महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांची समजूत काढली आणि राजश्री प्रोडक्शनमध्ये फोन करून अनुपम खेर यांनाच ती भूमिका मिळायला हवी असं स्पष्ट सांगितलं. यानंतर अनुपम यांनी त्यांच्या अभिनयाने ती भूमिका अजरामर केली.
-
अनुपम खेर यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात काम केलं. यातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली.
-
यानंतर अनुपम यांनी अमिताभ बच्चन आणि बोमन इराणीबरोबर ‘ऊंचाई’ हा चित्रपटही केला. प्रेक्षकांनी या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद दिला. आता लवकरच अनुपम पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहेत. (सर्व फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस आरकाइव्ह, जनसत्ता आणि आयएमडीबी)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”