-
आज आपल्या चित्रपटसृष्टीत असे फार कमी दिग्दर्शक आहेत ज्यांचे प्रत्येक चित्रपट हे १०० कोटींपेक्षा अधिक कमाई हमखास करतात. त्या काही मोजक्या दिग्दर्शकांपैकीच एक म्हणजे रोहित शेट्टी. आज रोहितचा ५० वा वाढदिवस.
-
रोहित शेट्टी हा प्रसिद्ध अभिनेता आणि स्टंट दिग्दर्शक एमबी शेट्टी यांचा मुलगा असूनहीत्याला खूप संघर्ष करावा लागला. रोहित शेट्टी आणि त्याच्या कुटुंबाचे कठीण दिवस त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सुरू झाले. यानंतर त्यांच्या घरात पैशांची चणचण भासू लागली अन् अशातच रोहितला शिक्षण सोडून घराला हातभार लावायची अन् आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली.
-
रोहित शेट्टीच्या वडिलांचे नाव एम बी शेट्टी. ते एक प्रसिद्ध स्टंट मास्टर होते तसेच बऱ्याच चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून कामदेखील केले होते.
-
वडिलांप्रमाणेच रोहितची आई रत्ना शेट्टीदेखील चित्रपटातील स्टंटवुमन होत्या. रोहितच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी यात करिअर सुरू केले. ‘सीता और गीता’ या चित्रपटात त्यांनी हेमा मालिनीच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती. एकूणच ही परिस्थिती बघता रोहीतने शिक्षण सोडून छोटं मोठं काम करायला सुरुवात केली.
-
चित्रपटक्षेत्राशीच जोडलेले असल्याने रोहितने स्पॉट बॉयपासून हेयर ड्रेसरपर्यंत जे पडेल ते काम केलं. इतकंच नव्हे तर ‘हकीकत’ चित्रपटाच्या सेटवर रोहित शेट्टीने तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्याचेही काम केले होते. तसेच याचदरम्यान त्याने काजोलचा हेअर ड्रेसर म्हणूनही काम पाहिलं. वयाच्या १७ व्या वर्षी रोहितने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं.
-
अजय देवगणने ज्या चित्रपटातून पदार्पण केलं त्या ‘फूल और कांटे’मध्ये रोहित शेट्टी हा सहाय्यक दिग्दर्शक होता. सहाय्यक म्हणून बरीच वर्षं काम केल्यावर रोहितने २००३ मध्ये ‘जमीन’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, अन् हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरला.
-
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर रोहित शेट्टीबरोबर काम करण्यास कोणी तयार नव्हते. त्यानंतर अजय देवगणने त्याच्यावर विश्वास ठेवला अन् अजय देवगणची रोहित शेट्टीबरोबर चांगलीच गट्टी जमली.
-
या दोघांनी मिळून कित्येक सुपरहीट चित्रपट दिले. याची सुरुवात त्यांनी ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ या चित्रपटातून केली. यानंतर त्यांनी या फ्रेंचायझीचे चार चित्रपट केले आणि ते सर्व हिट ठरले. याबरोबरच ‘ऑल द बेस्ट’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दिलवाले’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंबा’, ‘सर्कस’ सारखे दमदार चित्रपटही रोहित शेट्टीने दिले.
-
आता रोहित शेट्टी अजय देवगणच्या ‘सिंघम ३’वर काम करत आहे. अजय देवगण व्यतिरिक्त यात रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : रोहित शेट्टी इंस्टाग्राम पेज)
पुण्यात ३ दिवस किडनॅप केलं, मरेपर्यंत मारायला सांगितलं…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…