-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी निधन झाले.
-
अतुल परचुरे हे ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
-
कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देऊन यशस्वी झालेले अतुल हे रंगभूमीवर झोकात पुन:पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले होते.
-
मात्र, पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली.
-
अतुल यांनी बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केले होते.
-
अतुल यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका करत व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले.
-
‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु.ल. देशपांडे यांच्याकडूनच दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे पाच’ आदी नाटकांत केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.
-
नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर अभिनेता म्हणून घोडदौड सुरू असतानाच त्यांना कर्करोगाचे निदान झाले.
-
कर्करोगामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. सुरूवातीला झालेले चुकीचे उपचार, त्यानंतर कर्करोगावरचे उपचार अशी कडवी झुंज देत ते आजारातून बरे झाले होते.
-
अत्यंत जिद्दीने कर्करोगावर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केले होते.
-
त्यांची भूमिका असलेला ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
अतुल लवकरच ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची जय्यात तयारी सुरू होती.
-
या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
पोटाच्या विकाराचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. याही आजारपणातून बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील अशी आशा त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मित्रपरिवाराला होती.
-
मात्र, या आजारावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (सर्व फोटो सौजन्य : अतुल परचुरे/इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’