-
दाक्षिणात्य आणि बॉलीवूड दोन्ही चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे आर माधवन. त्याला चित्रपटसृष्टीत सगळे मॅडी म्हणून ओळखतात. हा अभिनेता त्याने साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध आहे. माधवन ‘अलाईपायूथे’ या सिनेमामुळे स्टार झाला आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला.
-
आर माधवन तमिळ असला तरी त्याचे महाराष्ट्राशी एक खास नाते आहे. आर माधवन कोल्हापूरचा जावई आहे. आर माधवनचा कोल्हापूरच्या सरिता बिरजे हिच्याशी विवाह झाला आहे. १९९९ मध्ये दोघांचा विवाह झाला असून त्यांच्या लग्नाला आता पंचवीस वर्षे झाली आहेत.
-
अभिनेता होण्यापूर्वी आर माधवन हा पब्लिक स्पीकिंग कोच होता. त्याचदरम्यान त्याची भेट सरिताशी झाली. सरिता तेव्हा एअर होस्टेस होण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत माधवनने सांगितले की, “सरिताला मी प्रशिक्षण दिले, त्यानंतर तिला पहिली नोकरी लागली, यासाठी मला धन्यवाद म्हणण्यासाठी तिने मला डिनरला आमंत्रित केलं होतं; त्याच क्षणापासून आमच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला.”
-
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता आर माधवनला विवाह टिकणार नाही अशी शक्यता लक्षात घेऊन किंवा अशा परिस्थितीत जोडप्यांनी कुठल्या आर्थिक गोष्टी विचारात घ्याव्यात हा प्रश्न विचारला. माधवनने या मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याची पत्नी सरिता थोडी असुरक्षित होती. परंतु, काही आर्थिक निर्णयांमुळे त्यांच्या नात्यात स्थिरता आली आणि त्यांचे २५ वर्षांचे सुखी वैवाहिक जीवन सुरू राहिले.
-
यूट्यूब चॅनेल For A Change वर बोलताना माधवन म्हणाला, “मी अभिनेता होतो, माझ्या सुरुवातीच्या काळात मला चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जात असे आणि मुली माझ्यावर फिदा होत्या. सहाजिकच, यामुळे स्त्रीच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ शकते. अशी असुरक्षितता निर्माण होणे विवाहाला अस्थिर करण्यासाठी पुरेसे असते.
-
याच मुलाखतीत माधवन म्हणाला, “मी माझ्या पालकांना विचारायचो की त्यांनी लग्न टिकवण्यासाठी काय केलं? ते म्हणायचे, ‘आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गोष्टी बिघडणार असं गृहीत न धरता, त्या योग्य होतील असं गृहीत धरलं.’ त्यांनी नेहमीच सर्व गोष्टींसाठी एकत्रित बँक खाते ठेवलं होतं. मला ही खूप चांगली कल्पना वाटली.”
-
माधवन पुढे म्हणाला, “जर सरिताला तिच्या बँक खात्याकडे पाहताना असुरक्षित वाटणार असेल, तर आम्ही एकत्र बँक खाते तयार करू आणि म्हणू, ‘हे आमचं संयुक्त खातं आहे, हे दोघांचं आहे आणि त्यावर तुझीही तितकीच हक्काची सही असेल जितकी माझी आहे.’ मी असं गृहीत धरतो की हा विवाह टिकणार आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी आशा करतो की तूही माझ्यावर विश्वास ठेवशील.”
-
आर माधवनने १९९८ साली ‘शांती शांती शांती’ या कन्नड चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना हैं तेरे दिल में’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने हिंदी, तमिळ, कन्नड भाषेतील अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
-
आतापर्यंत माधवनने सर्व चित्रपटांमध्ये त्याचे नाव आर. माधवन असे लावले आहे. पण त्याचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याच्या वडिलांचे नाव आर. अय्यंगार आहे, तर आईचे नाव आर. सरोजा असे आहे.(All Photo Credit – R Madhavan Instagram)